पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड] हिंदु धर्मातील सामान्य सिद्धान्त. २६३


कल्याण आहे. गरिबाच्या झोपडीपासून राजवाड्यापर्यंत आणि बालापासून वृद्धापर्यंत सर्वांना धर्ममार्गावर आरूढ करणे, हे तुमचे आद्य कर्तव्य आहे. हे जग अमुक एक हजार वर्षांपूर्वी परमेश्वराने निर्माण केले आणि एखादे दिवशी तो त्याचा अखेरचा शेवट करून टाकील हे काही इतर धर्मीयांचें मत आपणां हिंदूंस मान्य नाही, हा आपला तिसरा विशेष होय. त्याचप्रमाणे परमेश्वराने चराचर सृष्टि निर्माण केली आणि तिच्या मागोमागच मनुष्यप्रा णीहि त्याने निर्माण केला हेहि ह्मणणे आपणांस मान्य नाही. परमेश्वराने ही सृष्टि केवळ अभावांतून निर्माण केली हे मतहि आम्ही त्याज्य समजतो. या मुद्यासंबंधी आपणांतील सर्व मतांची आणि पंथांची एकवाक्यता आहे, असा माझा समज आहे. सृष्टि अनाद्यनंत असून कल्पांताच्या वेळी तिचे हे जड अथवा दृश्यरूप नष्ट होऊन सूक्ष्म रूपाला ती परत जाते; काही काळ त्या अव्यक्तरूपांत स्थिर रहाते; आणि पुनः योग्य काळी व्यक्तरूपाला येऊन आपण पहात असलेली सारी सृष्टि दिसू लागते असे आमचे मत आहे. ही चक्राकार गति कालाच्या आरंभाच्याहि आदीपासून चालू आहे; आणि ती अशीच चालू रहाणार आहे. भविष्यकाली अमुक एका प्रसंगी या सृष्टीचा अखेरचा अंक होईल हे म्हणणे आह्मांस मान्य नाही.
 त्याचप्रमाणे मनुष्याचा देह दिसतो अथवा त्याच्या अंतरिंद्रियांचा प्रत्यय येतो तेवढयांतच मनुष्यप्राणी साठविलेला असतो असें नसून, त्याचे स्वरूप त्याहून अधिक विशाल आहे असेंहि आम्हां हिंदूंचे मत आहे. देह अस्थिर आहे, त्यांत प्रत्येक क्षणी बदल होत आहे; त्याच प्रमाणे मनोघटनाहि अस्थिर आहे; पण या दोन अस्थिर स्वरूपांपलीकडे चिरस्थायी स्वरूपाचें आत्मरूप आहे. आत्मा या शब्दाला योग्य प्रतिशब्द इंग्रजी भाषेत नाही. त्याला कोणताहि प्रतिशब्द तुम्ही योजला तरी तो चुकीचा होईल. आत्म्याला आदि नाही आणि अंतहि नाही. मृत्यु हा शब्द त्याच्या गांवीं नाही. हे आमचे मत इतर धर्मीयांस ठाऊक नाही. या बाबींत इतरांपासून आम्ही अगदी विभक्त आहो. हा चिरस्थायी आत्मा वारंवार वेगवेगळ्या देहांचा आश्रय करित असतो, आणि त्याचा कार्यभाग संपला म्हणजे तो कायमचा मुक्तरूपांत रहातो, हे आमचे मतहि इतरांहून विशेष आहे. आमच्या सर्व शास्त्रांनी या मताचे प्रतिपादन केले असून आम्हां साऱ्या हिंदूंस तें सारखेंच