पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२६२ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.[ नवमः


तथापि अशा स्थितीतहि श्रुतिप्रामाण्याला आपल्या दृष्टीने बाध येत नाही. श्रुति हे परमपूज्य ग्रंथ आहेत आणि मानवी जीविताच्या रहस्याचे कोडे त्यांनी उलगडले आहे, याबद्दल आपणांत मतभेद नाही. असें आहे तर प्रत्यक्ष व्यवहारांत दिसून येणारे पंथांचे भेद विसरून जाणे आपणांस अशक्य नाही. या तत्त्वाचाच प्रसार होईल तितक्या झपाट्याने मोठ्या प्रमाणावर आपण केला पाहिजे.
 ईश्वराच्या अस्तित्वाबद्दलही आपणांत वाद नाहीं हा दुसरा मुद्दा आहे. आपण सारे आस्तिक्यवादी आहों. परमेश्वर सृष्टीचा उत्पन्न कर्ता आणि पालनकर्ता असून कल्पांताच्या वेळीही सृष्टि त्याच्याच स्वरूपांत समाविष्ट होते, हे मतहि आपणां सर्वांस सारखेंच मान्य आहे. यथाकाळी हीच सूक्ष्म रूप सृष्टि पुनः स्थूलरूप धारण करून नानाविध वस्तूंच्या रूपाने प्रकट होते. ईश्वराच्या स्वरूपाबद्दल आपणांत वाद असू शकेल; कोणाला त्याचे शुद्ध व्यक्त रूपच मान्य असेल तर दुसऱ्या कोणाला तो निराकाररूपाने मान्य असेल आणि या दोघांनाही श्रुतींत आधार सांपडतील. तथापि असे असतांहि परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दल आपणांत वाद नाही. परमेश्वर म्हणजे अनंत शक्ति आणि त्या शक्तींतूनच हे सारे विश्व प्रकट झाले असून तिच्यांतच तें रहातें व अखेरीस त्याच शक्तीला ते परत जाते, या मूलतत्त्वाबद्दल आपणां हिंदूंत मतभेद नाही. किंबहुना हे मूलतत्त्व ज्याला मान्य नाही त्याला हिंदूहि ह्मणतां येणार नाही. हे तत्त्व आपणां सर्वास सारखेंच मान्य आहे. त्याचाच प्रसार साऱ्या देशांत आपण करूया. तुह्मांस साधेल त्या मार्गाने हे तत्त्व सर्व लोकांस पटेल असें करा. आपणां सर्वांचे मार्ग भिन्न झाले तरी त्यांत अमुक खरा व अमुक खोटा अशी निवड करिता येत नाही हे लक्षात ठेविले पाहिजे. एखादा मार्ग दुसऱ्याहून कदाचित् अधिक चांगला असेल; तथापि सर्वथैव खोटा असा एकहि मार्ग नाही. एक कनिष्ठ, एक मध्यम, एक चांगला अथवा एक सर्वोत्कृष्ट असा भेद असू शकेल; तथापि खोटा हे विशेषण कोणासहि लावितां येणार नाही. धर्ममार्गाच्या बाबतींत खोटा या शब्दाला स्थानच नाही. याकरिता ईश्वराचा मार्ग दाख विण्यास जे कोणी उद्युक्त असतील, त्या साऱ्यांनाच परमेश्वराचा आशीर्वाद आहे. कोणत्याही मार्गाने का होईना त्याची ओळख सामान्य जनांस अधि काधिक पटवून देण्याचे कार्य तुम्ही केले, तर त्यांत सा-या हिंदु कुलाचेच