पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड.] हिंदु धर्मातील सामान्य सिद्धान्त, २६१


पंथ म्हणजे एकाच वस्तूची अनेक नांवें होत. याकरितां, या पंथवाल्यांनी आपसांत तंटे करणे, युद्धे करणे, परस्परांचा द्वेष आणि मत्सर करणे अथवा परस्परांस व्यर्थ हिणवू पहाणे ही खरोखरच मोठ्या शरमेची गोष्ट आहे. ज्या भूमीत साऱ्या धर्माना आणि धर्मपंथांना सारखाच मान आजपर्यंत मिळत आला आहे, आणि सहिष्णुतेचे बाळकडू ज्या देशांतील पुण्य पुरुषांनी आ पल्या वंशजांस पाजलें, त्या देशांतील सध्याच्या पिढीने असहिष्णुतेचा अंगी कार करावा हे अगदी अयोग्य आहे. सहिष्णुता ज्यांच्या रोमरोमांत खेळत होती, त्यांचे वंशज म्हणविण्यास आम्हांस खरोखर लाज वाटली पाहिजे.
 वैष्णव, शैव, शाक्त, गाणपत्य, वेदांती इत्यादि अनेक मते आपणांत प्रचलित असली अथवा ही सारी टाकून देऊन कोणी अर्वाचीन पद्धतीचा भक्त बनला असला, तरी आपणां सर्वांना सामान्य अशी काही तत्त्वे आपल्या धर्मात आहेत. अर्वाचीन सुधारलेल्या धर्माचा अंगीकार कोणी केला अथवा जुन्या कर्मठ पंथाचा कोणी असला, तरी या दोहींचीहि एकवाक्यता जेथें होते अशी काही तत्त्वे आहेत. या सामान्य तत्त्वांचे स्पष्टीकरण देगवेगळ्या पद्धतीने कोणी केले असले, तरी मूल तत्त्वांच्या मान्यतेबद्दल वाद नाही. अशा प्रकारचे ध्येय असणारच आणि ते तसे असावें हे इष्टहि आहे. सर्वांनी एकाच मार्गाने गेले पाहिजे हा आपला मूल हेतु नाही. आपलेंच म्हणणे सर्वांनी मान्य केले पाहिजे असा हट्ट धरणे हे पातक आहे. अखेरचा मुक्काम 'एकच असल्यावर रस्ते वेगवेगळे असणे हे रास्त आणि इष्टही आहे. आपल्या मार्गाने जाण्यास आपणांस जशी मुभा आहे, त्याचप्रमाणे ती इतरांसही असली पाहिजे. श्रुतींस मान्यता हे आपल्या धर्माचे सर्वमान्य तत्त्व आहे. सनातन धमाचे रहस्य श्रुतीत आहे, या सिद्धांताबद्दल कोणीहि हिंदू वाद घालणार नाही, असे मला वाटते. त्याचप्रमाणे श्रुति अनाद्यनंत आहेत असे सर्व हिंदूंचे मत आहे. प्रकृतीला ज्याप्रमाणे आदि अथवा अंत नाही, त्याचप्रमाणे श्रुतींनाहि आदि अंत नाही. आपणांत कितीहि मतभेद झाले आणि त्याबद्दल कितीहि रणे माजली तरी या साऱ्या तंट्यांचा अखेरचा निकाल लागण्याची जागा श्रुति हीच. श्रुतींत कमी अथवा अधिक महत्त्वाचा भाग कोणता, या बद्दलहि आपणांत मतभेद असू शकेल. एखादा भाग एखाद्या पंथाला सार सर्वस्वरूप वाटला तर तोच भाग दुसऱ्याला कदाचित् कमी महत्वाचा वाटेल;