पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड.] हिंदु धर्मातील सामान्य सिद्धान्त. २५५


अर्थाचा कांहीं ध्वनी निघतो असें कोणास वाटते; पण या म्हणण्यांत मला तथ्य दिसत नाही. सिंधुनदापलीकडे राहणारे ते हिंदु इतकाच अर्थ प्राचीन काळी होता. आपल्या द्वेष्ट्यांनी यांत आतां कांहीं वाईट अर्थ घुसडला असेल, पण नुसत्या नांवांतच काही विशेष अर्थ आहे असे नाही. हिंदु हा शब्द उज्ज्वल कीर्तीचा आणि पराविद्येचा दर्शक होणे अथवा तो गुलामगिरीत तुडविले गेलेल्या लोकांचा दर्शक होणे, हे सर्वस्वी आपणावरच अवलंबून आहे. आपण हल्लींसारखेच नास्तिक, निरुपयोगी आणि परावलंबी राहिलों तर हिंदु हा शब्द या दुर्गुणांचा द्योतक व्हावा, हे रास्तच आहे. सांप्रतकाळी या शब्दाला काही वाईट अर्थ आला असेल तर त्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका, आणि त्याबद्दल वादही करीत बसू नका. कोणत्याहि भाषेचें सारें सामर्थ्य एक वटून उच्चगुणदर्शक शब्द निर्माण करावयाचे, तर तो शब्द हिंदु हा एकच होऊ शकेल असे आपण आपल्या कृतीने सिद्ध करूं या. जगांतील साऱ्या अत्युच भावना या एकाच शब्दांत सांठविण्याचे कार्य आपण करू या. आपल्या पूर्वजां बद्दल अथवा त्यांच्या कृतीबद्दल स्वतःस केव्हांहि लाज वाटू द्यावयाची नाही, हा माझा एक निश्चय सारा जन्म मी अबाधित राखिला आहे. जगांत कोणी अत्यंत अभिमानी मनुष्य असेल तर तो मी आहे. पण हा अभिमान माझ्या स्वतःबद्दलचा नसून माझ्या पूर्वजांबद्दल आहे हेहि तुम्हांस प्रांजलपणे सांगि तले पाहिजे. प्राचीनकाळाचा अभ्यास जो जो मी करितो, तो तो माझा हा अभिमान वाढतच जातो. माझा हा अभिमान अस्थानी नाही, अशी खात्री अधिकाधिक पटत गेल्यामुळेच माझी बुद्धि निश्चित स्वरूपाची होते; आणि चव्हाट्यावर उभे राहून हे शब्द जगासमोर उच्चारण्याचे धैर्यहि मला प्राप्त होते. आपल्या पूर्वजांच्या चरित्राच्या अभ्यासामुळेच मी रजाचा गज झालो. ह्या आपल्या पूर्वजांनीच मला स्फूर्ति देऊन आपलें उच्च कार्य माझ्या हस्तें सुरू केले. तुम्ही त्याच आर्यांची मुलें आहां; आपल्या पूर्वजांबद्दल तुम्हांसहि असाच अभिमान उत्पन्न व्हावा अशी परमेश्वराची प्रार्थना मी करितों. तुमच्या पूर्वजांच्या ठिकाणी जी अचल श्रद्धा होती, तीच तुमच्या रक्तांत आणि रोमरंध्रांत पुनः खेळू लागो. ती तुमच्या जीवात्म्याशी एकरूप होवो आणि मुक्तिमार्ग सा-या जगासाठी मोकळा करण्याचे पुण्य तुम्हांस

लाभो.