पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड.]आपणांपुढील कार्य.२४७


तुम्हांस आढळले आहे काय ? नियमाने 'चर्चात' जाऊन ईश्वर प्रार्थना केल्याने ईश्वरप्राप्ति होणार नाही. पवित्र नद्यांची स्नाने करून आणि गंधभस्माचे पट्टे ओढूनहि ईश्वरप्राप्ति होणार नाही. त्याचप्रमाणे काळे, पिवळे अथवा भगवे कपडे घालूनही तो तुम्हांस मिळावयाचा नाही. इंद्रधनुष्याच्या साऱ्या रंगांनी तुम्ही स्वतःस सुशोभित केले तरी ईश्वर तुम्हांस दिसावयाचा नाही. जोपर्यंत अंतःकरणाचे कपाट उघडले नाही आणि जोपर्यंत तें विस्तृत होऊन विश्वा कार झाले नाही, तोपर्यंत हे बाहेरचे सारे देखावे व्यर्थ होत. अन्तःकरण रंगले पाहिजे; मग बाहेरचा रंग असो वा नसो. अंतःकरण रंगणे हाच खरा धर्म; आणि तोच खरा आत्मप्रत्यय. बाह्यरंगांची थोडीबहुत मदत या मार्गात तुम्हांस होत असेल, तर ती तुम्ही खुशाल ध्या; पण या रंगांची गुलामगिरी तुम्ही करूं नका. त्यांतच काही विशेष आहे, असें तुमच्या चित्ताने एकवार घेतले, की तुमच्या मार्गात तुम्हांस मदत करण्याऐवजी तुमच्या पायांत ते श्रृंखलांसारखे होऊन पडतील. मग हे रंग म्हणजे धर्म असें तुम्हांस वाटू लागेल. देवळांत एकदां देहाला नेऊन आणले की, धर्मकार्य संपलें असें तुम्हांस वाटू लागेल. भिक्षुकाला घरी बोलावून आणि त्याची बडबड ऐकून दक्षिणा दिली की, स्वतःस धार्मिक म्हणवून घेण्यास तुम्हांस हरकत दिसे नाशी होईल. याकरितां या बाह्य वस्तूंच्या नांगींत जें विष आहे त्यापासून तुम्हीं सावध राहिले पाहिजे. ज्याच्या अंतःकरणांत अनुराग उत्पन्न झाला, त्याला बाहेरच्या रंगरागाची जरूर नाही. हाच खरा धर्म होय. जो मनुष्य बाह्य उपाधींत धर्म सांठविला आहे असें खरोखर समजत असतो, तो अव नतावस्थेस गेला आहे असे समजावें. बाह्य इंद्रियांच्या द्वारे सृष्टपदार्थांचें ज्ञान करून घेणे हेहि खरें ज्ञान नव्हे आणि ईश्वराप्रत पोहचण्याचाहि तो मार्ग नव्हे. आमच्या शास्त्रांनी हा मुद्दा वारंवार बजावून सांगितला आहे. क्षणोक्षणी बदलणाऱ्या या विश्वाच्या मागे जे नित्य एकरूप आहे, त्याचा अनुभव ज्यायोगें होईल तो धर्म. सर्वांचा खरा धर्म हा एकच. आभासमय विश्वाच्या मागे असलेले सत्यरूप ज्याने ओळखले, आपल्या स्वतःच्या ठिकाणी असलेलें आत्मरूप ज्याच्या अनुभवास आलें, जो परमेश्वराला प्रत्यक्ष समो रासमोर भेटला आणि वस्तुमात्रांत ज्याला परमेश्वर दिसू लागला,तोच एक 'ऋषि' या पदवीला योग्य झाला असे समजावें. हे ऋषित्व प्राप्त होईपर्यंत