पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२४६ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.[नवमः


प्रकटीकरणाचे मार्ग अनेक असून स्वरूपहि भिन्नभिन्न असू शकतात. याक रितां अर्वाचीन अथवा प्राचीन पंडितांपैकी कोणा एकाचीच बाजू धरण्याचे आपणांस कारण नाही. प्राचीनकाळी ज्याप्रमाणे अनेक मंत्रद्रष्टे आणि ऋषि होऊन गेले, त्याचप्रमाणे ते चालू काळी असून पुढेही ते निर्माण होणार आहेत याविषयी शंका बाळगू नका. फार काय, पण प्राचीनकाळी ज्याप्रमाणे व्यास, वाल्मीक आणि शंकराचार्य होऊन गेले, त्याचप्रमाणे त्यांची योग्यता स्वतःच्या अंगी तुम्हांसहि आणता येईल. तुम्हीं शंकराचार्य होऊ नये असे कोणतेंहि कारण अस्तित्वात नाही.
 आमच्या धर्माचा हाहि एक विशेष आहे. आपलें ज्ञान ईश्वरदत्त होते असें इतर धर्माचे प्रवर्तक म्हणत, यामुळे त्यांच्या मतांना जो अधिकार प्राप्त झाला तो खुद्द ईश्वरापासून आलेला आहे, असे त्याचे सर्व अनुयायी म्हणत आले आहेत. ईश्वराशी इतकें साहचर्य फारच थोड्यांच्या नशिबी असणार हे उघड आहेआणि फक्त त्यांच्याच मार्फत आपणांसारख्या सामान्य जनांची गांठ ज्ञानाशी पडणार असें दुसरे धर्मानुयायी म्हणतात. यामुळे आद्य धर्म प्रवर्तकाने जें कांही सांगितले असेल त्याचे ग्रहण डोळे मिटून आपण केलें पाहिजे असा इतर धर्माचा हट्ट आहे. नॅझारेथच्या येशूला अशाच ज्ञानाची प्राप्ति झाली होती आणि याकरितां आपण सर्वांनी त्याची आज्ञा शिरसावंद्य मानली पाहिजे असा ख्रिस्तानुयायांचा हट्ट असतो. पण आमच्या धर्माची गोष्ट तशी नाही. हे ज्ञान कोणा एखाद्यालाच प्राप्त होण्यासारखे आहे, असे आम्ही कधीच म्हटले नाही. पूर्वकाळच्या मंत्रद्रष्टयांना ते जसें प्राप्त झाले, तसेंच तें भविष्यकालच्या मंत्रदृष्टयांनाही प्राप्त होईल. आतां इतकें मात्र खरें की, वाक्पंडितांना, पुस्तकी विद्वानांना अथवा प्राचीनभाषाकोविदांना तें प्राप्त होणार नाही. त्यासाठी द्रष्टेपणच अंगी आले पाहिजे. सूक्ष्मविचार प्रत्यक्ष पाहण्याचे सामर्थ्य ज्याच्या अंगी असेल, त्याला तें अवश्य प्राप्त होईल. मोठ मोठे वादविवाद दीर्घकाळपर्यंत करीत बसलात तरी त्यामुळे आत्मानुभव तुम्हांस होणार नाही, तुमची बुद्धि कितीहि विशाल झाली तरी आत्म्याचे आकलन ती करूं शकत नाहीं; आणि सारे श्रुतिग्रंथ तुम्हीं मुखोद्गत केले तरी त्यानेंहि या ज्ञानाची प्राप्ति तुम्हांस होणार नाही. खुद्द श्रुतींचेही असेंच वचन आहे. अशा अर्थाचे वचन जगांतील दुसऱ्या कोणत्याही धर्मग्रंथांत