पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२४८ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [ नवम


तुम्ही धर्मज्ञ झाला असे म्हणतां येत नाही. तुम्ही तसे झाला म्हणजेच धर्माच्या खऱ्या मार्गाला तुम्ही लागला असे होईल. आता तुम्ही जे काही करीत असतां ती केवळ पूर्वतयारी आहे. ऋषित्व प्राप्त होईपर्यंत ज्या नाना विध गोष्टी तुम्ही करितां त्यांनी फारतर तुमच्या बुद्धीला तालीम मिळेल; किंवा तुमच्या क्रिया शुद्ध जडदेहापुरत्या असल्या तर त्याला कष्टविण्यापुर ताच त्यांचा उपयोग होईल. या क्रिया सोडून ऋषित्वाच्या मार्गाकडे तुम्ही वळला म्हणजेच धर्ममार्गावर तुम्ही चालू लागला असें होईल.
 याकरितां, येथें जो एक मुद्दा विशेषेकरून सांगितला आहे, तो आपण सर्वांनीच लक्षांत बाळगण्याजोगा आहे. तो इतकाच की, ज्याला मुक्तीची खरी लालसा असेल, त्याला ऋषित्व प्राप्त करून घेण्यावांचून दुसरा मार्गच नाही. मंत्रवक्ता नव्हे, तर मंत्रद्रष्टा त्याने झाले पाहिजे. परमेश्वराची प्रत्यक्ष भेट त्याने घेतली पाहिजे. आमच्या श्रुतींनी घालून दिलेला हा नियम सना तनस्वरूपाचा आहे. हा मुख्य मुद्दा ध्यानात ठेविला म्हणजे श्रुतींचे रहस्य सम जून घेणे सोपे होते. आपल्या मनश्चक्षुवरील पटल नाहीसे होऊन आपल्याच डोळ्यांनी तेथील अर्थ आपण पाहूं शकतो. आपण कोणत्या अवस्थेत आहों आणि आपणांस जरूर कशाची आहे हे आपण जाणूं शकतों; आणि हेच करणे आपणांस अवश्य आहे. पूर्वी होऊन गेलेल्या टीकाकारांनी केलेल्या टीकांचा अ नादर करण्याचे कारण आपणांस नाही. त्यांच्याबद्दल पूर्ण पूज्य बुद्धि आपण बाळगावी. ते सारेच थोर पुरुष होते; पण आतां आपणांस त्यांच्याहूनहि अधिक थोर व्हावयाचे आहे. एक मोठे कार्य त्यांनी केले पण आपणांस त्यांच्याहून मोठे कार्य करावयाचे आहे. त्यांना नमन करून या अधिक मोठ्या कार्याला आपण लागू या. हिंदुस्थानांत पूर्वी शेंकडों ऋषि होऊन गेले. आता असे लक्षावधि ऋषि आपण निर्माण करूं या, असा मनाचा कृतनिश्चय करून तुम्हांपैकी प्रत्ये कजण जेव्हां कार्याला लागेल, तेव्हां मातृभूमीच्या उन्नतीचा क्षण अगदी जवळ होईल. यांत एकट्या हिंदुस्थानाचेंच नव्हे तर साऱ्या जगाचेहि कल्याण आहे. तुमच्या बुद्धीचा निश्चय मात्र झाला पाहिजे. जो तुमचा निश्चय तसेंच तुमचे स्वरूपहि होईल. आपण धैर्यशाली आहों असा निश्चय तुम्हीं केला, तर तुम्ही धैर्यशाली व्हाल. आपण ऋषि आहों हेच चिंतन तुम्ही सदोदित केले तर तुम्ही उद्यांच ऋषि व्हाल. तुम्हाला कोणीही अडवू शकणार नाही. अनेक