पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड ] हिंदुस्थानांतील तत्त्ववेत्ते. १९७


रच्या पूज्य बुद्धीमुळेच शृतिना हिंदुस्थानांत आदिस्थान मिळाले आहे. स्मृति आणि पुराणे यांनी या बीजांचा विस्तार मात्र केला आहे. विचारपरं परेचें मूळ शृतीत असून त्याच विचारांचा विस्तार स्मृतिपुराणादिकांत अस ल्यामुळे त्यांचे प्रामाण्य दुय्यम प्रतीचे ठरलें यांत नवल नाही. सामान्य मार्गदर्शनाचे कार्य शृतींनी उत्तम प्रकारे केले आहे. केवळ दिशा जाणावयाची असेल तर शृतींपलीकडे पहाण्याची गरज नाही. मानवी श्रेष्ठ जीवाचें अंतिम ध्येय काय याचा विचार शृतींपलीकडे करितां येणे शक्य नाहीं; आणि त्यांनी सांगितलेल्या ज्ञानाबाहेर जाणायाचे राहिले असें ज्ञानही नाही. जाणावयाजोगें जितकें कांहीं होते, त्या साऱ्याचे आकलन श्रुतींनी केले आहे; आणि जीवात्म्याला पूर्ण दशा प्राप्त व्हावी ह्मणून आवश्यक असलेले मार्गही श्रुतींनी आधीच सांगून टाकले आहेत. यांतील बारीकसारीक तपशील मात्र त्यांनी सांगितला नाही; आणि तो सांगण्याचे कार्य स्मृतींनी केले. श्रुतींतील एकाच मार्गाचा विस्तार कालस्थलानुरूप स्मृतींनी वेगवेगळ्या प्रकारे केला आहे; तथापि प्रकारांच्या या वेगळेपणामुळे मूळ सत्य वस्तूंत काही फरक झाला आहे असें मात्र नाही. स्मृतिग्रंथांचे कर्ते बहुतेक पुरुष असून काहींचे कर्तृत्व स्त्रियांकडेही आहे. स्मृतींची दृष्टि प्रमेयाच्या परोक्ष स्वरूपाकडे नसून ती त्याच्या प्रत्यक्ष अथवा व्यावहारिक स्वरूपाकडे अधिक असल्यामुळे ती चर्चा व्यक्तींची उदाहरणे देऊन त्यांनी केली आहे. यांत कित्येक व्यक्ति आपणांस अवतारिक स्वरूपाच्या आढळतात.त्यांजकडे पाहून आपले मन थक्क होऊन जाते. त्यांच्या अलौकिकप णामुळे आपलें हृदय दडपून जाते. सारे जग हालवून सोडण्याचे सामर्थ्य ज्यांच्या अंगी आहे, अशा प्रचंड व्यक्ती आपणांसमोर जणूंकाय प्रत्यक्ष उभ्या राहतात. त्यांच्या पराक्रमांच्या वर्णनानें आपलें चित्त इतकें भारून जातें की, त्यांचा तत्त्वोपदेशहि क्षणमात्र आपल्या चित्तांतून नष्ट होतो. त्यांचा उपदेश विसरून त्यांचे व्यक्तित्व मात्र आपल्या मनांत शिल्लक रहाते.
 हिंदु धर्माचा तत्त्वोपदेश करण्याचा मार्ग विशिष्ट स्वरूपाचा आहे. हे स्वरूपहि आपण विशेषेकरून ध्यानात ठेवले पाहिजे. यांत परोक्ष तत्त्वे आणि व्यक्तिविशिष्ट परमात्मरूप अशा दोन प्रकारांचा अन्तर्भाव होतो. परोक्ष तत्त्वांची चर्चा हिंदु धर्मानें जशी मनमुराद केली आहे, त्याचप्रमाणे परमेश्व राच्या मानवी अवतारांची लीलाही त्याने मनसोक्तपणे केली आहे. तथापि