पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१९८ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [ नवम


या धर्माचा मूळ झरा शृतिग्रंथ हेच होत. शृतिग्रंथांत केवळ परोक्ष तत्त्वांची चर्चा मात्र केली आहे. त्यांत कोणा अवतारांचे वर्णन नाहीं, अथवा त्याने केलेल्या अद्भुत कृत्यांचा मागमूसही तेथे आढळावयाचा नाही. हा सारा उद्योग त्यांनी स्मृतींकडे सोपविला आहे. स्मृति आणि पुराणे यांत परमेश्वराच्या अवताराचे दर्शन आपणांस होते; आणि त्यांतच दुसरेहि अनेक महापुरुष आपणांस आढळतात. येथे आणखीहि एक विशेष मुद्दा लक्षात ठेवण्यासारखा आहे. हिंदु धर्म कोणाहि व्यक्तीशी बद्ध झालेला नाही. अशा प्रकारें कोणा व्यक्तीशी, अवताराशी अथवा भविष्यवाद्यांशी संलग्न न झालेला असा धर्म फक्त आमचाच आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. जगांतील बाकीच्या साऱ्या धर्माचे अस्तित्व त्याच्या मूळ संस्थापकावर अवलंबून राहिले आहे. ख्रिस्ती धर्माची उभारणी ख्रिस्तचरित्रावर झाली आहे. महंमदी धर्म महंमदाच्या चरित्रावर रचला गेला आहे; आणि अशाच रीतीने बौद्ध आणि जैन धर्म त्या त्या धर्माच्या संस्थापकांवर अवलंबून आहेत. यावरून एक गोष्ट उघड दिसून येण्यासारखी आहे, ती ही की, या धर्मसंस्थापकांच्या चरित्राच्या सत्यतेबद्दल ऐतिहासिक पुराव्याची जरूर उत्पन्न होते; आणि त्याबद्दल त्यानंतर विलक्षण वादविवाद आणि तंटेही उत्पन्न होतात. या महापुरुषांच्या अस्तित्वाबद्दल ऐतिहासिक दृष्ट्या कधींकाळी संशय उत्पन्न झाला अथवा त्याबद्दलचा पुरावा काही कारणाने लंगडा झाला, तर त्यांच्या अनुषंगाने उभी राहिलेली धर्माची इमारतही त्याबरोबरच कोसळण्याचा संभव आहे. असल्या प्रकारच्या आप त्तींतून हिंदु धर्म हजारों वर्षे वांचला याचे कारण हेच की, त्याचे अस्तित्व कोणाही व्यक्तीवर अवलंबून नसून तत्त्वाशीं तें जोडलेले आहे. हिंदु धर्माचे अनुयायी त्याचे सत्यत्व आज कबूल करतात याचे कारण तो अमुक एका व्यक्तीने सांगितला हे नसून त्यांतील तत्त्वें केवलरूप आणि त्रिकालाबाधित आहेत हेच होय. कित्येक व्यक्तींस हिंदू लोक अवतारी पुरुष मानितात; त्यांच्या रूपाने प्रत्यक्ष परमेश्वर अवतरला असें ते समजतात.
 तथापि हिंदु धर्माचे अस्तित्व या अवतारी पुरुषांवरही अवलंबून नाही. भगवान् श्रीकृष्ण ही व्यक्ति कितीही मोठी असली तरी शृतिग्रंथावर टीका करण्याचा अधिकार तिला नाही. एवढेच नव्हे तर स्वतः प्रतिपादन केलेल्या

मतांस आधार म्हणून शृतिवचनांचा उल्लेख श्रीकृष्णास स्वतः करावा लागतो.