पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुस्थानांतील तत्त्ववेत्ते.
-----**-----

 हिंदुस्थानांतील तत्त्ववेत्त्यांविषयी बोलण्याचा विचार मनांत आणतांच ऐतिहासिक काळाच्यामागे कित्येक शतकें माझें मन धाव घेतें. या काळाचा उल्लेख कोणाहि इतिहासकाराने केलेला नाहीं; आणि या काळांतील अंधका रांत दडून राहिलेलें रहस्य बाहेर आणण्याची धडपड दंतकथांनी केली असतां तीहि निष्फळ झाली आहे. हिंदुस्थानांत तत्त्ववेत्ते किती होऊन गेले याची मोजदाद करणे बहुधा दुरापास्त आहे. कारण, गेली हजारों वर्षे तत्त्ववेत्ते निर्माण करण्यावांचून दुसरा कोणता धंदा हिंदु राष्ट्राने केला आहे ? याक रितां हिंदी तत्त्ववेत्त्यांसंबंधी चर्चा करितांना त्यांतील काही शेलक्या व्यक्तींचा उल्लेख मात्र मी करणार आहे. तत्त्वमीमांसेच्या बाबतीत जे शब्द कर्त्यांच्या योग्यतेचे झाले, तेवढयांबद्दलच थोडीबहुत माहिती मी तुम्हांला सांगेन. आरंभी श्रुतींसंबंधी थोडीशी माहिती करून घेणे आपणांस इष्ट आहे. सत्य वस्तूची चर्चा श्रुतींनी मुख्यतः दोन प्रकारे केली आहे. यांत त्यांच्यापुढे साध्ये अथवा ध्येये दोन प्रकारची आहेत. एक साध्य कालस्थलातीत असून दुसरें कालस्थलाने बद्ध आहे. विशेष परिस्थिति, काल आणि देश एवढया पुरतेंच हे साध्य सत्यरूप आहे. हे नितांत सत्य नव्हे. कालस्थलातीत अथवा शुद्ध सत्यवस्तूची चर्चा श्रुति अथवा वेदग्रंथ यांनी केली आहे. यांत जीवा त्म्याचे स्वरूप परमात्मरूप, आणि जीवशिवांचा संबंध इत्यादि वस्तूंची चर्चा केली आहे. यानंतर दुय्यम प्रतीचे ग्रंथ म्हणजे स्मृतिग्रंथ होत. मनु याज्ञव ल्क्य इत्यादिकांनी हे स्मृतिग्रंथ लिहिले असून दुसऱ्या कित्येकांनी लिहिलेले पुराणतंत्रादि ग्रंथ याच दुय्यम कोटींत येतात. या दुय्यम प्रतीच्या ग्रंथांत सांगितलेल्या प्रमेयांचे मुख्य प्रामाण्य श्रुतिग्रंथांवरच अवलंबून आहे. श्रुति आणि स्मृति यांत विरोध आला असतां श्रुतीच प्रमाण मानली जाते. हा निबंध सर्वव्यापी आहे. यांत कोणालाही ढवळाढवळ करण्याचा अधिकार नाही. मुख्य प्रमाणभूत ग्रंथ शृति आणि त्यानंतर स्मृति, असा क्रम आज दीर्घ कालापासून चालत आला आहे. मनुष्याचें अंतिम ध्येय काय याचा पूर्ण विचार शृतिंनी केला असून त्याची मुख्य बीजे त्यांनीच सांगितली आहेत. अशा प्रका-