पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड.] हिंदु चरित्रक्रमांतील वेदान्ताचे स्वरूप. १७५


नाचें सार, प्राचीन हिंदु तत्त्ववेत्त्यांच्या सा-या विचारसागरांतील अमृत मुक्तीच्या अफाट कल्पनातरंगांचे रहस्य इतक्या सुंदर आणि परिपूर्ण रीतीने प्रकट झाल्याचे दुसरे उदाहरण तुम्हांस कोठे सांपडेल? मनुष्याच्या जीवा त्म्याचे सुंदर चित्र या अल्प कथेत रंगविले आहे. आपल्या जीवित वृक्षाची कडू आणि गोड फळे मनुष्यप्राणी साऱ्या जन्मभर खात असतो. संपत्तीमागे तो धावत सुटतो. इंद्रियजन्य सुखांचा पाठलाग तो करतो आणि सृष्टीतील पोकळ व नुसत्या दिखाऊ वस्तूंच्या मागे वेड्यासारखा पळत सुटतो. अशी धावपळ करून सुख गांठतां येईल अशी आशा त्याला खरोखरच आहे काय?
 जीवात्मा हा रथकार आणि इंद्रियें ही भडकलेल्या घोड्यांसारखी आहेत, अशीही कल्पना उपनिषदांत कित्येक ठिकाणी आढळते. या जगांतील पोकळ सुखांच्यामागे लागणाऱ्या मनुष्यांची गति वास्तविक अशीच आहे. सुखस्वप्ने पडावी आणि जागे झाल्याबरोबर जशी ती नाहींशी व्हावी, त्याचप्रमाणे जगां- तील सारी सुखें स्वप्नवत् आहेत असा अनुभव अखेरीस येतो. आपली सारी पूर्वकर्मे आठवून म्हातारी माणसें सुखी अथवा दुःखी होत असतात; पण या प्रचंड कर्मजालांतून कायमचे बाहेर कसे पडावें, याची कोणतीही युक्ति त्यांस सुचत नाही. जगाचे स्वरूप अशा प्रकारचे आहे. असें आहे तथापि प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यांत खरोखर महत्वाचे असे काही क्षण अवश्य येतात. अत्यंत दुःखाच्या प्रसंगींच नव्हे तर अत्यंत सुखाच्या वेळीही असे क्षण प्राप्त होत असतात. ज्या सूर्याचा प्रकाश ढगाच्या आवरणामुळे दिसत नसतो, त्याचा एखादा किरण अशा प्रसंगी दृग्गोचर होत असतो. पण मनुष्यप्राणी विलक्षण विसराळू असल्यामुळे ह्या अंधुक प्रकाशदर्शनाचे स्मरण त्यास राहत नाही. अशा विस्मृतीत काही काळ लोटल्यानंतर पुनः एखादा असाच प्रसंग येऊन पुन्हां एक वेळ हे शुभ दर्शन त्याला घडते. आपल्या या इंद्रियांच्या आटोक्यांत कधीही न येणारे अशा प्रकारचे काही अस्तित्व असेल अशी आपली कल्पनाही नसते. हे अस्तित्व शुद्ध प्रकाशरूप आहे हेही आपणास कळत नसते आणि यामुळे या प्रकाशमयाचे दर्शन आपणास घडावें,या इच्छेनें कांहीं खटपटही आपण कधी केलेली नसते. तथापि असे असतांही क्वचित् प्रसंगी या इंद्रियबाह्य प्रकाशाचा क्षणिक प्रत्यय आपणास अवश्य येतो. हे प्रकाशमय अस्तित्व आपल्या इंद्रियांच्या बाहेर आहे; एवढेच नव्हे तर आपल्या साऱ्या