पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१७६ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.[नवमः


सुखदुःखांच्या, आपल्या स्वर्गीय कल्पनांच्या आणि या साऱ्या सृष्टीच्याही बाहेर तें आहे. ऐहिकसुखाची परमावधि अथवा त्याही पलीकडच्या स्वर्गीय सुखाची कल्पना या अस्तित्वास आकलन करू शकत नाही. हे अस्तित्व संप त्तिविषयक अथवा संततिविषयक अत्यंत तीव्र कल्पनेच्याही पलीकडचे आहे. पक्षीरूप जीवात्मा सांसारिक सुखदुःखरूप फळे भक्षण करीत असतां त्याला या अस्तित्वाचा प्रत्यय जेव्हां येतो तेव्हां तोही क्षणभर अगदी स्तब्ध होत्साता त्या दुसऱ्या पक्ष्याकडे पाहतो. त्या वेळी तो दुसरा पक्षी कडू अथवा गोड फळे न खातां आपल्याच ठिकाणी संतुष्ट होऊन स्तब्ध बसला अस- ल्याचे त्याला आढळून येते. 'यस्त्वात्मरतिरेवस्यादात्मतृप्तश्च मानवः । आत्म- न्येव च संतुष्टस्तस्य कार्यं न विद्यते ॥' असें गीतावचन आहे. ज्याची भक्ति फक्त आत्म्याच्याच ठिकाणी जडली आहे, ज्याला आत्म्याशिवाय दुसऱ्या कशा- चीही गरज उरलेली नाही आणि जो आत्मतृप्त झाला आहे त्याला दुसरें कोणतें कर्तव्य उरणार ? क्लेशदायक कर्माचा अवलंब त्याने कां करावा ? अशी आत्मतृप्तीची अवस्था ज्या ठिकाणी प्राप्त होते त्या ठिकाणाचे क्षणमात्र दर्शन मनुष्याला होते, पण तें तो लवकरच विसरतो आणि पुन्हां कर्मचक्रांत पडून त्याची कडू आणि गोड फळे खाऊं लागतो. अशा रीतीने आयुष्य व्यतीत होत असतां त्याला त्या शुभदर्शनाचा आणखी एखादा योग येतो. अशा रीतीने वारंवार धक्के खातां खातां त्या वरील पक्ष्यासंनिध हा खालचा पक्षी जात असतो. त्यांतच एखादा विशेष जोराचा धक्का बसण्याइतके त्याचे भाग्य प्रबळ असले, तर त्याची गति वाढून तो त्या आपल्या स्नेही पक्ष्या- कडे अधिकच लवकर जातो. त्या वेळी त्या वरील पक्ष्याचा प्रकाश आपणा- भोंवतीं पसरला आहे असें त्याला आढळून येतें. तो अधिकाधिक जवळ जाऊं लागला म्हणजे त्याच्या ठिकाणीही स्थित्यंतर घडून येऊ लागते. त्याचे मूळचें रूप हळू हळू नाहीसे होऊ लागते आणि अखेरीस त्या रूपाचा पत्ताही कोठे लागेनासा होतो. त्याला वस्तुतः अस्तित्वच नव्हते, तो केवळ छायारूप होता. वरील पक्ष्याची तो छाया होता. त्या वरील पक्ष्यालाच खरें अस्तित्व असून त्याचाच प्रकाश सर्वत्र भरला होता, तो अगदी निर्भय होऊन बसला होता, तो अगदी आत्मतृप्त होता आणि अगदी शांत होऊन बसला होता.

अशा रीतीनें शुद्ध द्वैतांतून थेट अद्वैतापर्यंत उपनिषदें तुम्हांस घेऊन जातात.