पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१४६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खंड ]भक्ति.१४१


आहों; आणि मानवी स्वभाव आहे असाच राहील तोपर्यंत मूर्तिपूजा चांग- लीच आहे असे म्हणणे प्राप्त आहे; कारण ती मानवी स्वभावाशी सुसंगत आहे. मानवी भावनेला ती सोडून नाही. आपल्या जन्मस्वभावाचे उल्लं- घन करून पलीकडच्या प्रदेशांत जाण्याची शक्ति कोणाच्या अंगी आहे ? अशी शक्ति फक्त अवतारी पुरुषांच्या अंगी मात्र असते. जी माणसें पूर्ण- त्वाला पोहोचलेली असतात तीच हे अतर्क्य काम करूं जाणतात. बाकीची सारी मूर्तिपूजक आहेत. आम्ही निराकाराचे उपासक आहों अशा बढाया तोंडाने त्यांनी कितीही मारल्या तरी ती मूर्तिपूजकच असतात. हे विश्व नाना प्रकारच्या आकारांनी भरले आहे, असें जोपर्यंत आपल्या डोळ्यांस दिसेल तोपर्यंत आपली पायरी मूर्तिपूजकाची आहे हे निश्चित होय. आपणा- सभोंवतीं दिसणारे हे विश्व हीच ईश्वराची एक प्रचंड प्रतिमा आहे आणि हिचें पूजन आपण प्रत्यही करीत आहो. 'मी देह' ही भावना ज्याच्या ज्याच्या चित्तांत शिल्लक असेल तो प्रत्येक मनुष्य साभावतःच मूर्तिपूजक आहे. वस्तुतः आपण चैतन्य आहों. ज्याला रूप नाही आणि आकारही नाही तें चैतन्य आपण आहो. जें जडरूप नाही आणि जें अमर्याद आहे तें चैतन्य आपण आहो. पण या वस्तुस्थितीचे आकलन करण्याचे सामर्थ्य ज्याला नाही आणि देहादि जडपदार्थांच्या द्वारेंच स्वतःच्या अस्तित्वाचा प्रत्यय ज्याला पटतो असा प्रत्येक मनुष्य मूर्तिपूजक आहे. अशी वस्तुस्थिति असतां एखाद्याने स्वतःस निराकारभक्त म्हणवून इतरांस मूर्तिपूजक म्हणून हिणवावें ही केवढया आश्चर्याची गोष्ट आहे ! थोडक्यात सांगण्याचा मुद्दा इतकाच की प्रत्येकजण मूर्तिपूजक असून स्वतःची मूर्ति त्याला पूज्य वाटते आणि इतरांच्या मूर्ती त्याज्य वाटतात. आपण निर्माण केलेल्या मूर्तीचे पूजन कल्याणप्रद असून दुसऱ्यांनी आपापल्या मूर्तीची पूजा करणे म्हणजे ईश- पूजन नव्हे असे तो म्हणत असतो.
 आतां अशी पोरकटपणाची खुळे आपण टाकून दिली पाहिजेत. पुष्कळसे मंत्र तोंडाने बडबडणे, तालसुरावर स्तोत्रे गाणे, अथवा अमुक विशिष्ट मतें आपली असे मानणे, बुद्धीच्या जोरावर घटपटांची शुष्क खटपट करणे, दुसऱ्या कोणीं कांही मतें सांगितली म्हणजे नंदीसारखी मान डोलविणे, अशा प्रकारच्या गोष्टींतच सारा धर्म भरून राहिला आहे असे वाटणे हे मूर्खपणाचे