पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१४५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१४०स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.[नवम


घालणे इष्ट आहे; पण पुढे तें काढून टाकण्याची वेळ जर कधीच आली नाही, तर त्या झाडाची वाढ खुंटलेली आहे हे सिद्ध होत नाही काय? त्याच- प्रमाणे धूपदीपादि साधनांचा त्याग आपणास मरेपर्यंत करता आला नाही तर आपली आध्यात्मिक बाल्यदशा संपली नाहीं असेंच म्हणावे लागेल.
 याकरितां ही साधनें निरंतर चालू राहिली पाहिजेत असे कोणी म्हणेल तर ते त्याच्या कच्च्या बुद्धीचे द्योतक समजावें. अखेरच्या साध्याकडे नेणारी ही साधने आहेत हे म्हणणे मात्र सर्वांशी खरे आहे. परोक्ष सिद्धांताची नुसती कल्पनाही पंगु मनाला होऊ शकत नाहीं; याकरिता त्याला अशा प्रकारचे टेंकू लावणे अयुक्त नाही.
 आतां येथे आणखीही एक भयाचे स्थल आहे. आध्यात्मिक वाढ म्हणजे बुद्धीची वाढ नव्हे, हे पक्के लक्ष्यात ठेवले पाहिजे. एखादा मनुष्य अगदी बृहत्पतीसारखा विद्वान असेल; पण त्याची आध्यात्मिक योग्यता लहान मुला- इतकीच असण्याचा संभव आहे. त्याचे प्रत्यंतर पाहण्यास फार लांब जाव- यास नको. ईश्वर सर्वव्यापी आहे हे तत्त्व तुम्हा सर्वांस पक्के ठाऊक आहे; पण सर्वव्यापी म्हणजे काय याची यत्किंचित तरी कल्पना तुम्हांस करतां येते काय ? या गोष्टीचा विचार आपल्या मनाशीच करून पहा. सर्वव्यापित्व या गुणाची कल्पना आपणांपकी किती जणांस आहे? सर्वव्यापित्वाची कल्पना मनाला व्हावी म्हणून आटोकाट धडपड तुम्ही केली तर, फार झाल्यास विशाल आकाशाची, अफाट महासागराची, विस्तीर्ण पृथ्वीची अथवा साहा -यासारख्या वालुकामय प्रदेशाची कल्पना तुम्हांस करता येईल; पण या साऱ्या जड प्रतिमाच आहेत. यांत सूक्ष्मरूपाची वस्तु एकही नाहीं; आणि परोक्षवस्तूचे आकलन परोक्ष या स्वरूपांत करण्याची शक्ति जोपर्यंत तुमच्या चित्तास आली नाही, तोपर्यंत अशाच प्रकारच्या जड वस्तूंचा आश्रय करणे तुम्हांस भाग आहे. साध्याची कल्पना साध्य या रूपांत जोपर्यंत करता येत नाही, तोपर्यंत साधनांच्या जड रूपाला तुमचे चित्त अवश्य चिकटून राह- णार. ही साधने अथवा या प्रतिमा मनाच्या बाहेर असल्या अथवा आंत असल्या तरी त्यांची किंमत एकच. जड वस्तूची प्रतिमा जड डोळ्यांनी पाहणे अथवा तीच प्रतिमा चित्ताने आठवणे यांत वस्तुतः काही फरक नाही. मनुष्यप्राणी जन्मतःच जडबुद्धि आहे. आपण सारे जन्मतःच मूर्तिपूजक