पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१२७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१२२

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[नवम


देशाचा धर्मच अशा प्रकारचा आहे. फार झाले तरी व्यक्तीला अनुरूप असा फरक या क्रियांच्या आचारांत दिसेल; परंतु तत्त्व एकच. एखादा मनुष्य काही विशिष्ट प्रकाराने प्राणायाम करीत असेल आणि मन एकाग्र करण्याचा एखाद्याचा मार्ग काही विशिष्ट प्रकारचा असेल; तथापि दोघांचें अंतिम साध्य एकच. जो तो आपापल्या रीतीने आपला अभ्यास निमूटपणे करीत असतो. आपल्या अभ्यासाच्या पद्धतीची चर्चा चार चौघांसमक्ष तो कधीच करीत नाही. फार काय, पण ती पद्धत त्याच्या खुद्द बायकोला सुद्धा समजावयाची नाही. मुलाचा मार्ग कोणता हे बापाला ठाऊक नसते. तथापि प्रत्येकानें अभ्यास केलाच पाहिजे हे मात्र खरे. असें आहे तथापि यांत कांहीं गुप्त अथवा अगम्य आहे, असेंही कोणी समजत नाही. 'गुप्त, अगम्य' या शब्दांचा संबंध अर्थाअर्थी अभ्यासाशी नाही. तुम्ही गंगातीरी गेला तर डोळे मिटून चित्तैकाय साधणारे हजारों लोक तुम्हांस आढळून येतील. या अभ्यासांतील सा-याच क्रिया सर्वांस साध्य होतील असें नाहीं; आणि असें होण्याची कारणे दोन आहेत. एक असें की योगमार्गावर आरूढ होण्याची योग्यता सामान्य मनुष्यांस असत नाही असें योगी म्हणतात आणि यामुळे हा मार्ग सर्वांस दाखविण्यास ते तयार नसतात. योग्यांच्या या म्हणण्यांत बरेंच तथ्य आहे ही गोष्ट खोटी नाही, तथापि त्यांत त्यांच्या स्वतःच्या आढयतेचाही अंश असतो हेही खोटें नाही. दुसरे असें की सामान्य जनांचा मार्ग सोडून एखाद्या वेगळ्या मार्गाचा स्वीकार करण्यास मनुष्याचे मन साहजिकच कचरतें. लोकांच्या उपहासाची भीति त्याला वाटत असते. तुमच्या या देशांत प्राणायाम करण्याची भीति पुष्कळांस वाटेल. चार चौघांसमक्ष हा अभ्यास करण्यास त्याचे मन कचरेल, कारण येथले लोक त्याला विक्षिप्त समजल्याशिवाय राहणार नाहीत. येथे 'फ्याशन' हेच दैवत आहे आणि 'फ्याशन' सोडून कोणी वागला तर तो लोकांच्या उपहासास अवश्य पात्र होतो. “हे देवा, माझी रोजची भाकरी मला दे" असली प्रार्थना करणे ही तुमची रूढी असल्यामुळे तसे करणे येथे श्रेयस्कर समजले जाते; पण हिंदुस्थानांत अशी प्रार्थना कोणी केली तर लोक त्याची थट्टा उडवितील. त्रैलोक्याधिपतीकडे जाऊन चतकोर भाकरी मागण्याची कल्पना त्यांच्या चित्तास पटावयाची नाही. “हे परमेश्वरा, आकाशांतील