पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

६८

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.


व तिच्या पूर्ततेसाठी दुसऱ्या कोणास तरी फसवून आपला कार्यभाग साधतात. त्याचप्रमाणे कोणतीहि गोष्ट करतांना युक्तायुक्ततेचा विचार अवश्य केला पाहिजे. एखादेवेळी जी एक गोष्ट करणे युक्त असेल तीच गोष्ट दुसऱ्या प्रसंगी अयुक्त ठरण्याजोगी असेल.

 परक्याशी भाषण करतांना तें अनुद्वेगकर, सत्य, प्रिय आणि हितकर असें असावें. परक्याच्या कामाविषयीं गृहस्थाने चर्चा करीत बसू नये.

 तळी व विहरी खणणारा, रस्त्याच्या बाजूस वृक्ष लावणारा, धर्मशाळा बांधणारा, आणि रस्ते व पूल बांधणारा गृहस्थ, योगमार्गाने प्राप्त होणाऱ्या लोकी जातो.

 याप्रमाणे गृहस्थाश्रमधर्मापैकी एका बाजूचें निरूपण केले आहे. तसेंच आपल्या देशासाठी व धर्मासाठी धारातीर्थी देह ठेवणारा गृहस्थ ध्यानी योग्याच्या गतीस जातो, असेंहि ह्मटले आहे.

 या एकंदर निरूपणाचा मथितार्थ असा आहे, की, प्रत्येकाने आपापल्या आश्रमधर्माप्रमाणे वागावें. तसेंच योग्य आश्रमधर्म आस्थेने आचरणाऱ्या सर्व मनुष्यांची योग्यता सारखीच आहे. आपापल्या परिस्थितीप्रमाणे प्राप्त होणारी कर्तव्ये आचरणे हेच धर्माचे रहस्य आहे.

 याप्रमाणे सर्व आश्रमधर्माचे निरूपण पाहिले तर सर्वात प्रमुखत्वाने आढळणारे असें एकच तत्व आहे. मनोदौर्बल्य नाहीसे करणे हेच मुख्यतः धर्माचें कार्य आहे असे विचारा अंती दिसून येईल. आश्रमधर्म म्हटला की, मग तो गृहस्थाचा असो अथवा संन्याशाचा असो, पहिली बाब मनोदौर्बल्य नाहीसे करणे हीच आहे. आपण सर्व वेद पाहिले तर ही हृदयदौर्बल्यत्यागाची कल्पना चोहोंकडे व्यापून राहिली आहे, असें आपणांस आढळून येईल. भीति ही दौर्बल्याची सूचक अशी वृत्ति आहे. जग काय ह्मणतें, मला कोणी हंसते की काय, असल्या क्षुद्र विचारांस थारा न देतां स्वतःला योग्य वाटेल तें कर्म नित्य आचरणे हे सर्व जीविताचे रहस्य आहे.

 कोणी एखादा वनवासी होऊन राहिला तर जगांतील संसारी लोक पापी आणि अभक्त असें त्याने स्वतःस वाढू देऊ नये. तसेंच संसारी लोकांनी त्यागी मनष्य झणजे निरुद्योगी व परान्नपुष्ट आहे असें ह्मणू नये. जो कोणी स्वीकृत तत्वाचा कोणासही न भितां आचार करित असेल तो मोठाच आहे. याबद्दल एक गोष्ट सांगतो; ह्मणजे तिजवरून या तत्वाचे मर्म आपल्या ध्यानी येईल.