पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

६७

'मी गरीब आहे, अनाथ आहे,' असें गृहस्थाने कधीहि म्हणूं नये. तसेच 'मी संपत्तिमान् आहे' असाहि उच्चार करूं नये. विहिताविहिताचा स्वतःशी विचार करून जें करणें तें करावें; दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिऊ नये. याप्रमाणे न वागणारा गृहस्थाश्रमी अनीतिमान् ह्मणविला जातो.

प्रत्येक गृहस्थाश्रमी मनुष्य समाजाच्या आधारस्तंभांपैकी एक मानला जातो. गरीब आणि अशक्त माणसें, मुलें व स्त्रिया इत्यादिकांचा तो पोषणकर्ता आहे. इतक्यांच्या पोषणाचा भार उचलण्याचे सामर्थ्य त्याच्या अंगी पाहिजे. आणि हे सामर्थ्य सदोदित वाढतें राहिले पाहिजे. याकरिता प्रसंगी त्याच्या हातून चूक झाली तरी तिजबद्दल सर्वांसमक्ष त्याने काही बोलू नये. अशा रीतीने त्याने स्वतःस उणेपणा आणला तर त्यामुळे त्याच्या ठिकाणी हृदयदौर्बल्य उत्पन्न होण्याचा संभव असतो. दुर्बळ मनुष्याकडून आश्रमधर्म पाळण्याचे काम बरोबर होणार नाही. तसेंच वित्त आणि ज्ञान यांच्या प्राप्तीसाठी त्याने खटपट केली पाहिजे. ही मिळविणे हे त्याचे कर्तव्यच आहे. तें तो न करील तर तो गृहस्थाश्रमास नालायक ठरेल. पैशाकरितां मेहनत न करणारा गृहस्थ अनीतिमान् आहे. जो आळशी आहे आणि आळसांत आयुष्य घालविणे ज्याला आवडतें तो गृहस्थाश्रमी मनुष्य अनीतिमान् समजावा. तो श्रीमान् झाला तर शेंकडों लोकांच्या उपयोगी पडतो. तुमच्या या शहरांत शेकडों लोकांनी श्रीमंत होण्याचा जर प्रयत्न केला नसता, तर येथे दिसणारी ही सदावर्ते आणि इतर लोकोपयोगी कृत्ये कधी तरी नजरेस पडती काय ? परोपकारी लागणारा पैसा मिळविण्यासाठी श्रम करणे हा गहस्थाचा धर्मच आहे. कारण जेथून सर्व लोकोपयोगी कार्यास मदत होते असें मध्यवर्ति ठिकाण ह्मणचे गृहस्थाचें घरच होय. नीतीने पैसा मिळवून तो परोपकारार्थ खर्च करणाऱ्या मनुष्याची योग्यता ससंगपरित्याग करून परमेश्वरप्राप्तीसाठी तप करणाऱ्या योग्याहून तिळभरहि कमी नाही. योग्यांत आढळून येणारा आत्मत्याग आणि परोपकारार्थ पैसा खर्च करणाऱ्या गृहस्थाचा आत्मत्याग यांत काय फरक आहे ?

आपली कीर्ति वाढविण्याची खटपट योग्य मार्गाने करणे हा गृहस्थाचा धर्म आहे. गृहस्थाने जुगार खेळू नये, दुष्टांच्या संगतीत राहूं नये, मिथ्या भाषण करूं नये, आणि दुसऱ्यास त्रास होईल असे कोणतेंहि काम करूं नये.

एखादी गोष्ट आपल्या हातून होण्यासारखी नसली तरी ती करावयाची हांव पुष्कळांस असते. अशा प्रकारची एखादी गोष्ट करावयास ते आरंभ करितात;