पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

६९

 एका शहरी एक राजा होता. तेथे कोणी संन्यासी आला की राजाने त्याला बोलावून आणून प्रश्न करावा की “ यति महाराज, संसारी मोठा की संन्यासी मोठा ? " यावर अनेकांकडून अनेक प्रकारची उत्तरे येत असत. कोणी ह्मणत की संन्यासी मोठा; परंतु त्यांचे ह्मणणे त्यांना सप्रमाण सिद्ध करतां न आले ह्मणजे राजाने त्यांस लग्न करून संसारी होण्याचा हुकुम करावा.

 असें होता होतां एके दिवशी एक संन्यासी त्या शहरी आला असतां राजाने त्यास बोलावून आणून हाच प्रश्न विचारला. तेव्हां संन्यासी ह्मणाला, “ राजा, अमुक एक आश्रम मोठा असें नाही. जो कोणी स्वीकृत आश्रमधर्म पाळतो तो मोठा.” राजा ह्मणाला, “ आपण ह्मणतां या गोष्टीची सत्यता प्रत्यक्ष प्रमाणाने आपण मला पटवून दिली पाहिजे.” राजाचे हे बोलणे यतीने कबूल करून राजासह तो त्या नगरांतून बाहेर पडला.

 याप्रमाणे फिरतांफिरतां ते दुसऱ्या एका मोठ्या राजाच्या नगरांत गेले. तेथे जिकडेतिकडे गर्दी उडून गेली होती. तासे, तर्फे आणि ढोल मोठमोठ्याने वाजत होते. त्या दिवशी तेथील राजकन्येचा स्वयंवरसमारंभ होता. मंडपांत उंची पोषाक करून हजारों प्रजाजन जमले होते. हे कौतुक पाहण्यासाठी आपला राजा व यति हेहि तेथेच उभे राहिले. याप्रमाणे स्वयंवर करण्याची चाल पुरातनकाळी आर्यावर्तात होती. प्रत्येक राजकन्या आपल्या पसंतीप्रमाणे वराची निवड करीत असे. कोणी राजकन्या उत्तम रूपावर लुब्ध होत असे, तर दुसरी एखादी अप्रतिम शौर्याची चहाती असे. आसपासचे सर्व राजपुत्र अशा समारंभास यावयाचे व त्यांतून एकाला कन्येने आपल्या पसंतीने वरावयाचे, अशी पद्धत होती. राजकन्येला तिची सखी प्रत्येक राजपुत्राचे गुण सांगत तिच्याबरोबर फिरत असे. असें होता होतां जो राजपुत्र कन्येच्या पसंतीस उतरे त्याला ती माळ घालीत असे.

 आपला राजा व यति ज्या नगरांत आले होते तेथील राजकन्या अप्रतिम लावण्यवती होती. तसेच त्या राजास पुत्रसंतान नसल्यामुळे राजाच्या पाठीमागे सर्व राज्यहि त्याच्या जावयासच मिळावयाचे होते. ही राजकन्या अप्रतिम रूपाची चहाती असल्यामुळे आपला पति अतुल सौंदर्यवान् असावा अशी तिची इच्छा होती. हजारों लोक व देशोदेशचे राजपुत्र त्या ठिकाणी जमले होते. राजकन्या त्या सभामंडळींत सखीसह फिरूं लागली. कित्येक राजपुत्रांस व इतरांस तिने पाहिले परंतु कोणीच तिच्या पसंतीस उतरेना. मोठ्या आशेने जम-