पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

६६

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.


द्रव्य, कपडे, प्रेम आणि अमृतोपम भाषण यांनी आपल्या पत्नीस सदोदित तुष्ट करित असावें. तिच्या शांततेचा भंग होईल असे कोणतेंहि कृत्य करूं नये. ज्याला सुशील धर्मपत्नीचे प्रेम संपादितां आलें त्याने धर्मार्थकाममोक्षादि चारी पुरुषार्थ संपादिले असे समजावें. आपल्या मुळांबाळांसंबंधी वर्तणुकीचे नियम सांगितले आहेत ते असे:

पुत्र चार वर्षांचा होईपर्यंत त्याचे प्रेमाने लालनपालन करावे. सोळावर्षीचा होईपर्यंत त्याला शिक्षण द्यावें. ता वीस वर्षांचा झाल्यानंतर त्यास उद्योगधंद्यास लावावे. नंतर त्याशी मित्राप्रमाणे प्रेमाने वागावें. याचप्रमाणे कन्येलाहि काळजीपूर्वक शिक्षण द्यावें, व तिच्या विवाहप्रसंगी तिला वस्त्रे भूषणे द्यावी.

आपले बंधु, आपल्या भगिनी आणि त्यांची मुले, तसेच इतर बांधव व चाकरनोकर यांसंबंधीहि विशिष्ट कर्तव्यांचा निर्देश केलेला आहे. त्याचप्रमाणे आपल्या मदतीची अपेक्षा करणारांस गृहस्थाने योग्य मदत करावी. जवळ पैसा असतां जो गृहस्थ गरीबगुरिबांस मदत करित नाही तो पशुवृत्तीचा समजावा. खरोखर तो मनुष्यच नव्हे.

स्वतःच्या शरीरावरील वस्त्रप्रावरण व स्वतःचे शरीर यांवर गृहस्थाने अतिप्रेम ठेवू नये. केंस तुळतुळीत राखण्याचा हव्यास गृहस्थास नसावा. अंतःकरणाने पवित्र व देहाने स्वच्छ राहावें; तसेंच त्याने उद्योगप्रिय आणि उद्योगरतं असावें.

आपल्या शत्रूंशी निकराने सामना करावा. शत्रूचा प्रतिकार करणें हें गहस्थाचे कर्तव्यच आहे. त्याने कोपऱ्यांत बसून अप्रतिकाराचे रडगाणे गाऊं नये. शत्रूला पाठ दाखविणारा गृहस्थ स्वकर्तव्यभ्रष्ट होतो. आपले मित्र आणि आप्त यांशी अत्यंत लीनतेने राहावें.

दुष्टांपुढे न वांकणे हे गहस्थाचे कर्तव्य आहे. दुष्टांपुढे मान वांकविणारा गृहस्थ जगांतील दुष्टपणा वाढविण्यास पर्यायाने कारण होतो. तसेंच जे मानार्ह असतील त्यांस मान द्यावा. मित्रांशी उच्छंखल वर्तन करूं नये. मित्र करण्यासाठी जिकडेतिकडे फिरूं नये. आपल्या परिचितांपैकी आपल्या कसाला कोणी उतरला असेल तेवढयासच मित्र ह्मणावें.

स्वतःच्या सत्कृत्याचा स्वतः उच्चार करूं नये. आपल्या सामर्थ्यांची स्वतः टिमकी वाजवू नये. स्वतःच्या संपत्तीबद्दल बोलू नये. तसेच कोणाचा रहस्यस्फोट करूं नये.