पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

६५


वळूनहि न पाहणे हे खरोखर असिधाराव्रतच आहे यांत संदेह नाही. जगाचा स्तुतिपाठ ऐकून एखाद्या क्लीबाचे बंदहि तटातट तुटतील. जगांत आपलें नांव राहील अशी आशा दिसली तर एखादा यःकश्चित मनुष्यहि प्रसंगी मोठी कृति करील ! कीर्तीची प्रचंड लालसा मानवी हृदयांत आहे. ती लालसा निखालस नष्ट करून जगाच्या स्तुतीची यत्किचितहि पर्वा न करतां लोकांचे बरे करण्यासाठी सदोदित झटावयाचे हे कर्म सोपें ह्मणतां येईल काय ? वास्तविक विचार केला तर हा यज्ञ सर्व यज्ञांत मोठा आहे. आपला व आपल्या कुटुंबियांचा चरितार्थ चालविण्याकरितां धनसंपादन करावयाचे हे गृहस्थाश्रमधर्माचें एक कर्तव्यच आहे; परंतु खोटे बोलून, कोणास फसवून अथवा चोरून धनसंपादन करता कामा नये. परमेश्वर आणि गरीब मनुष्ये यांच्या सेवेकरितांच आपलें जीवित आहे ही गोष्ट गृहस्थाने नित्य लक्ष्यांत बाळगिली पाहिजे.

आपली मातापितरें ही प्रत्यक्ष परमेश्वराची स्वरूपे आहेत असे समजून गृहस्थाने त्यांना सदोदित संतोष होईल असें वागले पाहिजे. मातापितरांचा संतोष तोच परमेश्वराचा संतोष होय. आपल्या मातापितरांस एकहि कटु शब्द जो चुकूनसुद्धां बोलत नाही तोच खरा सुपुत्र होय.

थट्टेचा अगर फाजील शब्द मातापितरांदेखत उच्चारूं नये, अधीरपणा दाखवू नये अथवा क्रोध येऊ देऊ नये. मातापितरांस नमन करून त्यांच्या समोर उभे राहावें व बसण्याबद्दल त्यांची आज्ञा झाल्यावांचून बसू नये.

आपली मातापितरें, आपली मुलेंलेंकरें व आपली धर्मपत्नी यांच्या अन्नवस्त्राची प्रथम तरतूद केल्याशिवाय त्या पदार्थाचा जो गृहस्थ उपभोग घेतो तो पातकी समजावा. मातापितरें या देहाच्या उत्पत्तीचे कारण असल्यामुळे कितीहि कष्ट पडले तरी ते सोसून त्यांस संतोष देणे हा पुत्रधर्म आहे.)

आपल्या धर्मपत्नीस कठोर शब्दांनी गृहस्थाने ताडन करूं नये, व आपल्या मातेप्रमाणेच तिची चांगली तरतूद ठेवावी. आपणास कितीहि त्रास पडत असला अथवा कष्ट सोसावे लागत असले तरी तिच्या देखत त्रासिक मुद्रा धारण करूं नये अथवा क्रोधाचा शब्द उच्चारूं नये.

आपल्या पत्नीवांचून इतर स्त्रीबद्दल मनाने देखील व्यभिचार घडला तर असा गृहस्थ दारुण नरकवासाचा धनी होतो.

कोणत्याहि स्त्रीसमक्ष अनुचित शब्द गृहस्थाने उच्चारूं नये; आणि आत्मश्लाघा करूं नये.
स्वा. वि. ५