पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

६४

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.


 सर्वसामान्य मनुष्यजातीला उक्त असें जें आचरण असेल त्याशिवाय या प्रत्येक आश्रमास उचित असे निराळे धर्म हिंदुतत्वग्रंथांत सांगितलेले आहेत. यांतील पहिला ब्रह्मचर्याश्रम हा आहे. यानंतर लग्न होऊन मनुष्य संसार करूं लागला ह्मणजे पहिल्या आश्रमांतून निघून तो गृहस्थाश्रमांत प्रवेश करतो. यानंतर वृद्धापकाळी संसारांतून विरक्त झाल्यावर तो वानप्रस्थाश्रमी होतो व शेवटी सर्वसंगपरित्याग करून संन्यासाश्रमाचा तो स्वीकार करतो. या सर्व आश्रमांस निरनिराळे धर्म ह्मणजे कर्तव्ये सांगितलेली आहेत. यांपैकी अमुक आश्रम अमक्यापेक्षा मोठा असा मात्र भाव नाही. ब्रह्मचर्याश्रम आजन्म स्वीकार करून धर्मज्ञानदानाचे काम करणारा मनुष्य आणि लग्न करून गृहस्थाश्रमांत पडून त्या आश्रमास अनुरूप अशा धर्माने वागणारा मनुष्य हे आध्यात्मिक दृष्टया सारख्याच योग्यतेचे आहेत. फार काय सांगावें, पण स्वधर्मरत असणारा रस्त्यांतील झाडूवाला आणि स्वधर्मपरायण तक्ताधिपति यांचीहि योग्यता आध्यात्मिकदृष्टीने अगदी एकसारखीच आहे. क्षणभर झाडूवाल्याला राजा केले आणि राजाला झाडूवाल्याचे काम सांगितले तर काय मौज होईल याची तुझीच कल्पना करा. कोणी त्यागी होऊन अरण्यांत जाऊन राहिला ह्मणून तो संसारी मनुष्यापेक्षा मोठा होतो असें नाही. वास्तविक विचार केला तर संसारांत स्वधर्मरत राहून परमेश्वराची उपासना करणे हे अरण्यवासाहून अधिक कठिण आहे. पूर्वीचे चार आश्रम सांप्रत नष्ट होऊन त्यांच्या जागी सध्या दोनच आश्रम मुख्यत्वे करून आढळतात. एक गृहस्थाश्रम आणि दुसरा संन्यासाश्रम. गृहस्थाश्रमी मनुष्याने संसारी होऊन लौकिक आचार पाळावे व ईशचिंतन करावें. संन्याशाने केवळ धर्मपरायण राहून परमेशचिंतन करावें, आणि लोकांस धर्ममार्ग दाखवावा. महानिर्वाणतंत्रांतील कांहीं वचने मी तुह्मांस सांगतों ह्मणजे गृहस्थाश्रमाचे धर्म तंतोतंत पाळणे हे किती दुष्कर आहे याची तुह्मांस कल्पना येईल.

 प्रत्येक गृहस्थाने परमेशचिंतन करित असावें. परमेश्वरप्राप्ति हेच साध्य त्याच्या नजरेसमोर सदोदित असावें; असें आहे तरी त्याने नित्यकर्मात कधी अंतर पडू देऊ नये. कर्म करणें तें फलाशेसाठी न करता केवळ कर्तव्य ह्मणून करावें.

 या जगांत कर्म करीत असतां फलाची यत्किंचिहि अपेक्षा न बाळगणे हे किती दुष्कर आहे याचा अनुभवच घेतला पाहिजे. एखाद्याला मदत करून नुसत्या कृतज्ञतादर्शक शब्दांचीहि अपेक्षा न करणे, तसेंच एखादें कृत्य करून कीर्ति आपल्या पाठीमागून येत आहे की काय, हे कळण्यासाठी नुसते मागे