पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

६३


एखाद्याने अमुक साध्य इष्ट आहे असे सांगितले ह्मणून त्या साध्याच्या मागे लागणे हे निःसंशय अनिष्ट आहे. उदाहरणार्थ, आपण एखाद्या लहान मुलाला त्याच्या शक्तीचा विचार न करितां आठदहा कोसांची मजल मारावयास सांगितले तर मुक्कामास पोहोचण्यापूर्वीच त्या बिचाऱ्याचा अंत होईल. जगांत वागतांना आपण पुष्कळ वेळां अशाच प्रकारचे वर्तन करीत असतो. कोणत्याहि एका समाजांतील सर्व स्त्रीपुरुष मनाच्या एकाच अवस्थेची अशी कधीहि असावयाची नाहीत. त्या सर्वांकडून एकच गोष्ट एकाच मार्गाने होणे शक्य नाही. त्यांपैकी प्रत्येकाचे ध्येय निराळे असणार व त्याच्या सिद्धतेचे मार्गहि निराळे होणार हे उघड आहे. ह्मणून कोणाच्याहि साध्यसाधनासंबंधाने त्यास नांवे ठेवण्यास अथवा त्याचा तिरस्कार करण्यास आपणांस अधिकार नाही. प्रत्येकाने आपल्या मार्गाने चालून इतरांसहि बिनहरकत त्यांच्या मार्गाने जाऊ देणे हे योग्य आहे. आंब्याचे लांकूड सागवानाइतके चांगले नाही ह्मणून अथवा सागवानाला आंब्यासारखी मधुर फळे येत नाहीत ह्मणून त्या दोहोंसहि वाईट ठरविणारा मनुष्य स्वतः शहाणा ठरेल काय ?

जगांत कितीहि भिन्नता दिसली तरी तिच्या मुळाशी एकात्मकता आहे. सृष्टि आकाराला आली ह्मणजे तींत भिन्नता आणि वैचित्र्य यावयाचंच असा नियम आहे. किंबहुना भिन्नतेवांचून सृष्टि आकाराला येणेच अशक्य आहे. तेव्हां या भिन्नतेस अनुसरून प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र ध्येय आणि स्वतंत्र मार्ग असावे हे सृष्टिनियमास अनुसरूनच आहे. सर्वांपुढे एकच ध्येय आणि एकच मार्ग ठेवला तर त्यांत कांहीं मागे पडणारच. तसे झाले ह्मणजे समाजांत निष्कारण द्वेष आणि दुही यांचे पीक येणार. आपण या मार्गात मागे पडतों असें दिसले ह्मणजे अशा मनुष्यांच्या ठिकाणचा आत्मविश्वास नाहीसा होतो, आणि आत्मविश्वास नाहीसा झाला ह्मणजे असा मनुष्य प्रायः स्थितप्रज्ञाची स्थिरता सोडून दगडाची स्थिरता पावण्याच्या मार्गास लागतो. ज्याचे जे साध्य असेल त्याला तदनुरूप मार्ग दाखविणे आणि त्याच्या उन्नतींत त्यास शक्य ती मदत करणे इतकेंच आपले कर्तव्य आहे. त्याचे ध्येय चुकीचे असेल तर हळुहळु ती चूक त्याच्या लक्ष्यांत आणून दिली पाहिजे.

हिंदु महात्म्यांनी हे तत्व जाणल्यास आज फार काळ लोटून गेला आहे. या तत्वाची अंमलबजावणी करण्याकरितां त्यांनी निरनिराळे आश्रम कल्पून तदनुरूप आश्रमधर्माची योजना केली आहे. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम असे हे चार आश्रम आहेत. .