पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

६२

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

किती धोक्याचे आहे याचे विवरण अगोदर केलेच आहे. आपल्या स्वतःवरहि या तत्वाच्या अंमलबजावणीचा परिणाम अत्यंत अहितकरच होतो. आपल्या कृतीकडे सर्व जग पाहत आहे ही जाणीव असेपर्यंत प्रतिकार न करण्याचे सोंग आपण आणूं. परंतु या सोंगाची बतावणी करित असतां आपणांस किती त्रास होतो व तोंड बांधून बुक्क्यांचा मार कसा सोसावा लागतो याचा अनुभव ज्याचा त्यालाच विचारला पाहिजे. स्थितप्रज्ञाचा निरिच्छपणा, समता व शांतता यांचे कवच नसतां जगाचे तीक्ष्ण बाण सोसावयाचे ही गोष्ट अशक्य आहे, असा आपणांस त्यावेळी अनुभव येतो व आपलें ढोंग सोडून देऊन जोराचा प्रतिकार करून पुढे सरावें असें मनांत आल्यावांचून राहत नाही. आपण श्रीमंत व्हावे अशी इच्छा तुम्हांस झाली आणि पैशाच्या मागे लागणे हे जगाच्या दृष्टीने पाप आहे असे समजून तुम्ही पैशाकरितां उद्योग केला नाही तरी तुमचे मन सदोदित 'कवडी कवडी ' असा जप केल्यावांचून कधीहि राहणार नाही. असा जप अहोरात्र चालू असतां त्यागी म्हणून स्वस्थ बसण्यांत काय शहाणपण आहे बरें ! अशावेळी स्वस्थ न बसतां व जगाच्या बरें अथवा वाईट ह्मणण्याकडे लक्ष्य न देतां सपाटून उद्योग करा. म्हणजे संपत्तीच्या प्राप्तीकरितां भोगावी लागणारी सुखदुःखें कशी असतात यांचा प्रत्यक्ष अनुभव येऊन तुमचें मन आपोआप शांत होऊं लागेल, व त्यागाचा सरळ रस्ता तुम्हांस दिसू लागेल. कोणतीहि इच्छा अतिप्रबळ झाली तर तिची तृप्ति करून घेणे हे ढोंगीपणापेक्षा परिणामी अधिक हितकर असतें. इच्छातृप्तीनंतर जो थोडा शांततेचा काल सांपडतो, त्यावेळी विचार जागृत झाला तर आपण एवढी खटपट करून मिळविलेलें सुख तुच्छ आहे असें तुमचे तुह्मांसच वाढू लागते. आणि ही जाणीव एक वेळ पक्की उत्पन्न झाली ह्मणजे त्यागापासून मिळणाऱ्या अननुभूत सुखाची खरी गोडी तुह्मांस कळेल. प्रखर उन्हाचा ताप अनुभवल्यावांचून सावलीच्या सुखाची खरी किंमत कळत नाही. त्यागापासून शांति मिळते असा उपदेश आज हजारों वर्षे साधुसंत करित आले आहेत. आपल्या जन्मापासून हे शब्द आपल्या कानांवर नेहमी आदळत आहेत. असे असतांहि खरे त्यागी आपणांस कितीसे दिसतात ? मी अर्ध्या जगावर फिरून अनुभव घेतला, परंतु असे वीस इसम सुद्धां आजपर्यंत माझ्या पाहण्यांत आले नाहीत.

आपल्या नजरेपुढे काही तरी साध्य ठेवून त्याच्या प्राप्तीकरितां यत्न करण्यास प्रत्येकाने प्रथम सुरवात करावी. हाच मार्ग नेहमी हितपरिणामी असतो. कोणी