पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्थिति ओळखूनच त्यास 'अशोच्यानन्व शोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे ' असें ह्मटलें, व 'क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परंतप' असा उपदेश केला.

 याप्रमाणे कर्मयोगाची प्रमुख कल्पना आहे. अप्रतिकाराचे तत्व अतिशय उच्च आहे ही गोष्ट प्रत्येक कर्मयोगी जाणत असतो. प्रतिकाराचे पूर्ण सामर्थ्य अंगी असतांहि मनावर ताबा ठेवून प्रतिकार न करण्यांत उत्पन्न होणाऱ्या शक्तीची जाणीवहि त्याला पूर्ण असते. परंतु इतकी अत्युच्च दशा प्राप्त होईपर्यंत प्रतिकार करूनच आपलें सामर्थ्य वाढविले पाहिजे हे ओळखून तो तदनुरूप वागत असतो. अत्युच्च ध्येय साध्य होईपर्यंत मधील मुक्कामावर थांबून आपल्या सामर्थ्याचा आढावा काढणे हाच मार्ग प्रत्येकास श्रेयस्कर आहे. जोपर्यंत भेकडपणाची यत्किचिहि छाया शिल्लक आहे तोपर्यंत अप्रतिकाराची कास धरणे ह्मणजे बुडत्या गलबतावर नांगराला मिठी मारण्यासारखे आहे.

 माझ्या देशांत एक अत्यंत आळशी आणि मूर्ख मनुष्य मला भेटला. तो दोन पायांवर चालणारा प्राणी असल्यामुळेच केवळ त्यास मनुष्य अशी संज्ञा प्राप्त झाली होती. तो मला ह्मणाला “अहो, परमेश्वरप्राप्तीचा कांहीं मार्ग मला दाखवाल काय ? मी मुक्त कसा होईन ते मला सांगाल काय ?" मी त्याला विचारिलें “तुला खोटे बोलतां येते काय? " तो ह्मणाला “ नाही." यावर मी. त्याला ह्मटले “ तर मग अगोदर खोटे बोलायाला शीक. लांकडाच्या ठोकळ्यासारखा होऊन बसण्यापेक्षां खोटे बोलणेहि कांही वाईट नाही. बाह्यतः अत्यंत निश्चल दिसणारी तुझी स्थिति स्थितप्रज्ञाची नसून दगडाची आहे. त्यामुळे कांही वाईट कृत्यहि तुझ्या हातून घडत नाही. तर प्रथम कांहीं वाईट कृत्य तरी करायाला शीक." मित्रांनों, यांतील थट्टेचा भाग सोडून दिला तर केवळ दगडाच्या स्थैर्यातून स्थितप्रज्ञाच्या स्थैर्याला पोहोचण्याकरितां कर्मयोगाच्या अगदी तळच्या पायरीपासून आरंभ करणे जरूर आहे हे माझ्या सांगण्याचे तात्पर्य तुमच्या लक्ष्यांत आलेच असेल.

 दगडासारखी निश्चल स्थिति कधीहि स्पृहणीय नाही; एवढेच नव्हे, तर सर्वथैव त्याज्य आहे. स्थितप्रज्ञाची शांतता प्राप्त होईपर्यंत प्रत्येकानें उद्योग हा केलाच पाहिजे; आणि उद्योग म्हटला की त्यांत प्रतिकार उत्पन्न होणारच. यास्तव उद्योगरत राहून वाईटाचा प्रतिकार करतां करतां स्थितप्रज्ञता तुह्मांस प्राप्त करून घेतली पाहिजे. 'कोणाचाहि द्वेष करूं नका, आणि वाईटाचा प्रतिकार करूं नका ' हे ह्मणणे फार सोपे आहे; परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे