पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[२]

अवतरून आह्मांस सन्मार्गाचा उपदेश करतात. विवेकानंद ह्मणतात 'अनेक सद्गुरूंचा आजवर उपमर्द करून सांप्रतची कर्मदशा तुह्मी आपणांवर ओढवून घेतली आहे !' हे त्यांचे ह्मणणे अक्षरशः खरे आहे. आमच्या धर्मात काय सांगितले आहे याचे ज्ञान आम्हास आज इतरांपासून प्राप्त करून घ्यावे लागत आहे ! 'धर्म'धर्म' ह्मणून हजारों खुळसट गोष्टींस आह्मी मिठी मारून बसलों आहों. आमचा धर्म कशांत आहे, त्याचे स्वरूप काय, धर्म ह्मणजे काय, इत्यादि गोष्टी आम्हास आज कोड्यासारख्या होऊन बसल्या आहेत. आमचे जुने धर्मग्रंथ समजण्याजोगी आमची स्थिति राहिली नाही व खऱ्या धर्माचरणाच्या अभावी आह्मी एकसारखे अवनतीस जात आहों हे पाहून आमचे पूर्वकालीन ऋषि आणि संत विवेकानंदरामतीर्थादि रूपाने अवतरले व जुना सनातनधर्म नव्या रूपाने त्यांनी आमहास पुन्हां सांगितला.

 अत्यंत तीव्र अशा विवेचकबुद्धीच्या साहाय्याने ज्यांना धर्मशास्त्राचा अभ्यास करावयाचा असेल, त्यांनी विवेकानंदांच्या ग्रंथांचा सतत अभ्यास केला पाहिजे. त्यांचा अभ्यास मन:पूर्वक केला तर आपले प्राचीन ग्रंथहि समजण्यास सुलभ होतील. विवेकानंदांच्या विचारमौक्तिकांचा लाभ निवळ मराठी वाचकांसहि करून द्यावा, या हेतूने आम्ही हा प्रस्तुतचा उद्योग आरंभिला आहे. परमेश्वराच्या कृपेने व आमच्या मराठी वाचकवर्गाच्या साहाय्याने हे काम तडीस गेले तर अशाच प्रकारचे इतर आचार्यांचे ग्रंथ व कांहीं स्वतंत्र ग्रंथहि मराठी वाचकांस अर्पण करण्याची प्रस्तुत लेखकास उमेद आहे. ही त्याची उमेद योग्य आहे की नाही हे ठरविणे मराठी वाचकवर्गाचे काम आहे. त्यांनी योग्य प्रोत्साहन दिले तर पुढील कामगिरीस तो हात घालील; न दिले तर आपली तितकी योग्यताच नाही असे समजून तो स्वस्थ बसेल.

 स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ अजमासें दहा खंडांत पूर्ण होतील अस वाटते. प्रत्येक वर्षी तीन किंवा चार खंड प्रसिद्ध करण्याचा आमचा मानस आहे. अशा व्यवस्थेनें ग्रंथांचा संग्रह करण्यास ग्राहकांस द्रव्यदृष्ट्या सुलभ होईल.

 स्वामी विवेकानंद यांचे चरित्र प्रथम खंडांत प्रसिद्ध करण्याविषयी कित्येकांनी पत्रद्वारा सूचना केली होती, परंतु स्वामीजींचे चांगले जीवनचरित्र आमांस उपलब्ध झाले नसल्यामुळे तें प्रसिद्ध करता आले नाही, त्यास आमचा नाइलाज आहे. स्वामीजींचे चरित्र मिळविण्याची आह्मी खटपट करीत आहों व ती यशस्वी झाल्यास तें आह्मी शेवटच्या खंडाच्या वेळी प्रसिद्ध करूं.