पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/8

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



प्रकाशकाची प्रस्तावना.
------♦------

 स्वामी विवेकानंद यांची ओळख आतां आमच्या वाचकांस नव्याने करून द्यावयास पाहिजे असे नाही. अर्वाचीन पाश्चात्य संस्कृतीचे केवळ माहेरघर अशी जी अमेरिका तेथे जाऊन ज्यांनी सनातनधर्माचे वर्चस्व स्थापिलें व थोड्याच वेळांत आपले नांव सर्वतोमुखी करून टाकलें, त्यांच्या कीर्तीत आमच्या स्तुतीने काही विशेष भर पडणार आहे असे नाही. त्यांनी बजावलेल्या कामगिरीचे खरें स्वरूप भगिनी निवेदिता यांनी आपल्या उपोद्घातांत स्पष्ट करून दाखविलेंच आहे; तेव्हां त्यासंबंधीहि कांही सांगण्याचे प्रयोजन आह्मांस उरले नाही.
 पाश्चात्य संस्कृतीच्या जबर धक्कयाने कित्येक शतकांच्या मोहनिद्रेतून आम्ही जागे झाल्यावर काही काळ आमची स्थिति फार चमत्कारिक झाली होती. गाढ अंधारांतून एकदम उजेडांत आलेल्या मनुष्याचे डोळे दिपून त्यास जसें कांहीं काळ यथार्थ वस्तुज्ञान होत नाही, तशीच आमची स्थिति झाली होती. जडवादाच्या अत्यंत मोहक स्वरूपामुळे विकृत झालेल्या आमच्या बुद्धीस 'पुराणे ह्मणजे शिमगा' वाढू लागली होती. 'अधर्म धर्ममिति या मन्यते तमसावृता। सर्वार्थान् विपरीतांश्च बुद्धिः सा पार्थ तामसी ॥' असें भगवंतांनी सांगितलेलें तामसी बुद्धीचे लक्षण आमच्या ठिकाणी पूर्णत्वाने प्रत्ययास येऊ लागले होतें. काही काळाने आमचे डोळे हळू हळू स्थिरावू लागले ही गोष्ट खरी; तथापि आमच्या बुद्धीची विकृति साफ बरी झाल्याचा प्रत्यय अद्यापिहि येत नाही. 'वेदांतानें आह्मी नेभळे झालों; 'साधुसंतांनी आमांस धारकऱ्यांचे वारकरी केलें; 'समाधि मणजे बेशुद्धि;' इत्यादि अनेक प्रकारचे जे उद्गार आह्मी काढतों, त्यांवरून आमच्या बुद्धीच्या शुद्ध स्थितीबद्दल सत्पुरुषांस शंका आली तर त्यांत नवल नाही. स्वतःच्या देहस्वाथ्याचाहि विचार न करतां ज्यांनी केवळ परोपकारार्थ आपले आयुष्य वेचलें, लोकांस सन्मार्गाचा उपदेश करणे हीच ज्यांची इतिकर्तव्यता, लोकसेवा हेच ज्यांचे ब्रीद, ‘राहिलों उपकारा पुरता' हाच ज्यांचा जप, आणि 'बुडते हे जन न देखवे डोळां' ह्मणून आमचा कळवळा येऊन ज्यांनी आमांस मोक्षमार्ग दाखविला त्या सत्पुरुषांस अशी शेलकी फुले वाहून त्यांचा उपकार आमी चांगलाच फेडला ! परंतु संत दयासागर आहेत. आमच्या कृतघ्नपणाकडे लक्ष्य न देतां ते आह्मांस पुनःपुन: बोधामृत पाजीत आहेत. ते कधीं तुकारामादि रूपाने, तर कधी त्रैलोक्यविजयी विवेकानंदरामतीर्थादि रूपानें