पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

६०

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.


घड्याळांतील अवर कांट्याची गति आपणांस दिसत नाही. तसेच एखाद्या अत्यंत झपाट्याने फिरणाऱ्या भोवऱ्याची गतीहि आपणांस दिसत नाही. तो भोंवरा निश्चळ उभा आहे असेंच आपणास वाटते. यावरून कोणत्याहि स्थितीची आत्यंतिक रूपं बाह्यतः अगदी एकसारखींच असतात, असे सिद्ध होते. अत्यंत हळु आणि अत्यंत झपाट्याची गति, ही गतीची वस्तुतः परस्पर अगदी विरुद्ध अशी स्वरूप असतां आत्यंतिकपणामुळे अगदी एकसारखी दिसतात. हा बोध आपणांपैकी कित्येकांनी मनन करण्यासारखा आहे. जड पदार्थांसंबंधी जसा हा नियम खरा आहे, तसाच तो चैतन्ययुक्त पदार्थासहि लागू पडतो. आपणास रस्त्याने जाणारा कोणी मनुष्य अपशब्द बोलत आहे हे पाहून एखादा स्तब्ध राहिला तर त्या कृतींत परस्परविरुद्ध असे दोन हेतु संभवतात. आपला शत्रु धष्टपुष्ट आहे हे पाहून भीतीने गप राहणे निराळे; आणि त्याचे तोंड एका तडाक्याने बंद करतां येण्याची शक्ति आपल्या मनगटांत आहे अशी पूर्ण जाणीव असतांहि त्याला केवळ क्षमा करून गप राहणे हे निराळे. बाह्यतः कृतीचे स्वरूप एकच आहे. परंतु हेतूंत मात्र जमीनअस्मानाचे अंतर आहे. यामुळे वरील कृति एकच असतां तिजपासून उद्भवणाऱ्या पापपुण्याचे स्वरूप मात्र अगदी भिन्न होतें. भीतीने गप राहणे ही कृति पापपरिणामी असून दुसरी कृति पुण्यकारक आहे. बुद्ध जन्मत: राजपुत्र असून सुखविलासांत वाढलेला असतांहि त्याने त्या सर्वांवर लाथ मारिली. याचें नांव खरा त्याग. परंतु खायाला मिळत नाही ह्मणून एकादशी करणारा भिकारी पुण्यवान् ह्मणतां येईल काय? यास्तव ज्यावेळी आपण प्रतिकार करणे हे पाप आहे असें ह्मणतो ते कोणत्या हेतूने ह्मणतों याचा विचार केला पाहिजे. येथे हेतु प्रधान असून कृति गौण आहे, ही गोष्ट नित्य लक्ष्यांत बाळगिली पाहिजे. प्रतिकार करण्याची ताकद आपल्यांत आहे की नाही याचा विचार प्रथम केला पाहिजे. आपणांत सामर्थ्य आहे अशी पक्की जाणीव असतांहि आपण दुष्टाचा प्रतिकार केला नाही तर आपण खरोखर मोठे पुण्य केल्यासारखे होईल. परंतु अप्रतिकाराच्या तत्वामागे आपला भेकडपणा लपवू पाहणे यासारखें दुसरें कोणतेंहि मोठे पाप नाही. आपणासमोरील प्रचंड सेना पाहून अर्जुनाचे चित्त क्षणभर कंपित झाले, आणि असें कंपित चित्त असतां त्यास अप्रतिकाराच्या तत्वाचे स्मरण झाले. परंतु या तत्वाच्या स्मरणाबरोबर तो स्वतःचे कर्तव्य विसरला; अथवा ही विस्मृति तरी कसली ? अप्रतिकाराच्या तत्वामार्गे तो आपली भीति लपवू पाहत होता. परंतु भगवान् श्रीकृष्णांनी ती