पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

१९


'मी पापी आहे' असें मनापासून कोणास वाढू लागले की त्याचा पहिला घातक परिणाम मनोदौर्बल्य हा होय. अशा दुर्बळ मनुष्याच्या हातून निश्चयाने कोणतीहि गोष्ट पार पडणे सर्वथा अशक्य आहे; आणि मनुष्य एक वेळ असा घसरणीस लागला की प्रतिक्षणी त्याचा वेग वाढत जाऊन तो अगदी तळाशी जाईपर्यंत मध्ये कोठे थांबण्यास त्यास अवसरच सांपडत नाही. मनोदौर्बल्याइतके मोठे पाप जगांत दुसरे कोणतेंहि नाही. मनुष्यजातीचा याच्याएवढा दुसरा मोठा शत्रु नाही. ज्याप्रमाणे मनोदौर्बल्य हे एका व्यक्तीच्या घातास कारण होते, त्याचप्रमाणे तें सबंध राष्ट्राच्या नाशासहि कारण होते. 'आह्मी मूर्ख, आह्मी पापी,' असें पठण करित बसणारे लोक दुर्गतिपंकांत असावयाचेच यांत कांही शंका नाही.

आपल्या स्वतःबद्दल आपले कधीहि अनिष्ट मत होऊ देऊ नये. मला असाध्य असें या जगांत कांहीं नाहीं असा अत्यंत दृढ विश्वास चित्तांत प्रथम उत्पन्न झाला पाहिजे; आणि नंतर परमेश्वरावर विश्वास पाहिजे. परमेश्वर जे जे काही करतो तें तें सर्व आपल्या बऱ्यासाठीच आहे, असा भरंवसा परमेश्वरावर पाहिजे. ज्याच्या ठिकाणी आत्मविश्वास नाही, त्याचा विश्वास परमेश्वरावरहि नाहींच, असें तुह्मी पक्कें समजा. सारांश, नीति आणि कर्तव्य यांचे स्वरूप देशकालानुरूप बदलतें ही गोष्ट नित्य ध्यानात बाळगून कोणासहि त्यांच्या चालीरीतीबद्दल दूषण देऊ नये. 'दुष्टाचा प्रतिकार करूं नये' हे जसें कर्तव्य आहे तसेंच, परिस्थिति बदलली तर 'दुष्टाचा प्रतिकार करावा' हेहि आपले कर्तव्यच होईल.

भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायांत भगवान् श्रीकृष्णांनी अर्जुनाला दांभिक व भित्रा ह्मणून दूषण दिले आहे, याबद्दल कित्येकांना मोठे नवल वाटत असेल. आपले आप्त, स्नेही यांजबरोबर युद्ध करणे हे अर्जुनाला मोठे पाप वाटले. सर्व विश्वावर प्रेम करणे हे आपले कर्तव्य असतां स्वजनांचा वध करावयाचा ह्मणजे प्रेमाला उघड्या डोळ्यांनी तिलांजुलि द्यावयाची असें होतें. अशा कल्पनेने अर्जुन युद्धास प्रवृत्त होईना. या प्रसंगापासून आपणा सर्वांस बोध घेतां येण्यासारखा आहे.

उजेड अत्यंत मंद असला तर तो आपणांस दिसत नाही. तसेंच तो अत्यंत तीव्र असला तरीहि आपणांस दिसत नाही. त्याचप्रमाणे आवाजाचे आहे. आवाज अगदी लहान असला तर जसा आपणांस ऐकू येत नाही, त्याच प्रमाणे अत्यंत मोठा आवाजहि आपणांस ऐकू येत नाही. गतीची गोष्टहि अशीच आहे.