पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

५८

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.


दुसऱ्या कित्येक देशांत तीच गोष्ट करणारा मनुष्य मूर्ख समजला जातो. अशी वस्तुस्थिति आहे तरी नीतीच्या व कर्तव्याच्या सामान्य कल्पना आपणा सर्व मानव जातीच्या एकच आहेत अशी जाणीव आपल्या अंतर्यामी नेहमी जागरूक आहे. अंतर्यामी असणाऱ्या जागरूकतेचा अनुभव आणि त्याच गोष्टींचा व्यवहार्य स्वरूपांतील भिन्नपणाचा अनुभव यांचा मेळ कसा घालावयाचा हा प्रश्न आपणापुढे उभा राहतो. या परस्परविरोधी अनुभवांची एकवाक्यता करण्यास दोन मार्ग मोकळे आहेत. 'मी ह्मणतों अथवा करतो तेंच बरोबर, तसें न करणारे इतर लोक मूर्ख आणि अनीतिमान् ' अशा रीतीने एकवाक्यता करणे हा एक मार्ग आहे; परंतु हा मूर्खाचा मार्ग झाला. शाहण्यांचा मार्ग याहून भिन्न आहे. भिन्न देशकालवर्तमान आणि भिन्न परिस्थिति यांमुळे एकाच सिद्धांताच्या व्यवहार्य स्वरूपांत भेद दिसतो. हा बाह्यतः दिसणारा भेद खरा नसून तो त्या सिद्धांताचे वैय्यर्थ्य न दाखवितां केवळ भिन्न परिस्थिति मात्र दाखवितो. एकवाक्यतेचा हा शहाण्या पुरुषांचा दुसरा मार्ग आहे. सिद्धांत एकच असला तरी त्याचे व्यवहार्य स्वरूप परिस्थित्यनुरूप बदलणे शक्य आहे येवढेच नव्हे तर तसे होणे इष्टहि आहे असें पंडितांचे मत आहे.

उदाहरणार्थ, 'दुष्टाचा प्रतिकार करूं नये' असा उपदेश येशुख्रिस्ताप्रमाणे इतर धर्मप्रवर्तकांनीहि केला आहे. स्वसंरक्षणार्थसुद्धा कोणालाहि दुखवावयाचें नाही हे ध्येय नि:संशय उच्च दर्जाचे आहे, ही गोष्ट आपणांस अंतर्यामी पटते. आतां आपण हे ध्येय नित्याच्या व्यवहारांत आणूं लागलों तर केवढे अनर्थ ओढवतील याची कल्पना करा. आमचें वित्त आणि जीवितहि सुरक्षित राहणार नाही. सर्व समाजसंघटना विस्कळित होऊन कोणाचा पायपोस कोणाच्या पायांत नाही, अशी स्थिति होऊन जाईल. फार काय सांगावें, आपण एकच दिवस वरील तत्वास अनुसरून वागावयाचे ठरविलें तरी सर्वत्र झोटिंगशाही माजेल. यासाठी या तत्त्वाचा उच्चपणा आपणांस अंतर्यामी पटला असला तरी त्याला व्यवहार्यरूप देणे आजच्या समाजाच्या स्थितीत अनिष्ट आहे. हे तत्त्व चांगले आहे त्या अर्थी याप्रमाणे न वागणारा तो पापी असे आपण ह्मणूं लागलों तर या पापांतून मुक्त असे मनुष्य फारसे आढळणार नाहीत. ह्मणजे या दृष्टीने बहुतेक सर्व मानवजाती पापी असें ह्मणावयाची पाळी येईल. आपण पापी अशी कल्पना जर एकवेळ खरोखर रूढ झाली तर ती केवढे अनर्थ करील व आपणा मनुष्यांस कोणत्या खाड्यांत नेऊन टाकील याचा नेम सांगवत नाही.