पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

क्रियाशून्य होतो. अशा वेळी आळसामुळे कोणताच विचार उत्पन्न होत नाही. कित्येक वेळां विलक्षण चपलतेचा आपल्या अंगीं संचार होऊन एखादें अवघड कामहि त्रास वाटल्याशिवाय आपण पार पाडतों; अशावेळी रजोगुणाचे प्राबल्य असते; आणि कित्येक वेळी आळस बिलकुल नसतां आपली वृत्ति अगदी शांत असते; अशा वेळी सत्वगुण अधिक प्रबल असतो. याहून अधिक स्थिर असेंहि ह्या गुणांचे दुसरें एक स्वरूप आढळून येते. कित्येक मनुष्यांत या तिहींपैकी कोणत्या तरी एका गुणाचे प्राबल्य नेहमीच विशेष असते. कित्येक स्वभावतःच आळशी असतात. कित्येक स्वभावतः अत्यंत उद्योगप्रिय आणि चळवळे असतात; आणि कित्येक शांत स्वभावाचे आणि मित व मधुरभाषी असतात. हे तीन स्वभावविशेष अनुक्रमें तम, रज आणि सत्व या गुणांचे द्योतक आहेत. या त्रिगुणांवांचून असणारा एकहि पदार्थ या सृष्टीत नाही. झाडेझुडपें, पशुपक्षी आणि मनुष्ये यांत कमीअधिक प्रमाणाने या गुणत्रयाचें मूर्तस्वरूप दृग्गोचर झाले आहे.

कर्मयोगांत मुख्यत्वेकरून या त्रिगुणांचाच विचार केला आहे. यांच्या गुणांचें स्वरूप काय आहे, आणि त्यांचा यथायोग्य उपयोग कसा करता येईल याचे ज्ञान आपणास झाले ह्मणजे आपले कर्तव्य अधिक सशास्त्र मार्गाने कसे करावें हैं आपणास समजतें. मानव समाजांची रचना देशकालानुरूप निरनिराळ्या प्रकारची झालेली आहे. नीति ह्मणजे काय याचें सामन्य ज्ञान आम्हांस सारखेच असते. तसेच कर्तव्य ह्मणजे काय हेहि आह्मांस सामान्यपणे समजतें. तथापि निरनिराळ्या देशांच्या निरनिराळ्या चालीरीतींस अनुसरून या शब्दांच्या व्याख्यांत बदल होत असतो. जी गोष्ट एका देशांत नीतीची अशी समजली जाते तीच दुसऱ्या देशांत नीतीस अगदी विघातक समजली जाते. काही देशांत चुलत बहिणीशी लग्न करणे ही सामान्य व्यवहारांतील गोष्ट आहे. परंतु दुसऱ्या देशांत तीच चाल नीतीस अगदी विरुद्ध अशी मानली जाते. कित्येक देशांत मेहुणीशी लग्न करणे हे पाप आहे असे समजतात. तर दुसऱ्या कित्येकांत तसे समजत नाहीत. कित्येक देशांत एका पुरुषास एका वेळी एकच पत्नी असणे हे नीतीचें दर्शक मानले जाते, तर दुसऱ्या कित्येकांत एकाच वेळी चारपांच अथवा शेपन्नास बायका असणे ही सामान्य चाल आहे. अशाच रीतीने नीतीच्या इतर तत्वांचेंहि व्यवहार्य रूप प्रत्येक देशांत निरनिराळे आढळतें.

याचप्रमाणे कर्तव्याचीही गोष्ट आहे. मनुष्याने काही एखादी गोष्ट केली नाही तर तो कर्तव्यच्युत झाला असे काही ठिकाणी समजले जाते. परंतु