पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.


अशी मानसिक स्थिति आम्हांस प्राप्त करून घ्यावयाची आहे. माणसांनी गजबजून गेलेल्या रस्त्यांत अरण्यांतील गुहेची शांतता मिळविणे आणि अरण्यांतील गुहेत अत्यंत कार्यरत राहतां येणें अशी संयुक्त स्थिति आपणास प्राप्त करून घ्यावयाची आहे. कर्मयोगाचे हेच ध्येय आहे. ही स्थिति तुह्मास प्राप्त करून घेतां आली तरच कर्मयोगाचे रहस्य तुह्मीं जाणलें असें होईल.

 ही स्थिति प्राप्त करून घेण्याकरितां आपल्या चालू परिस्थितीत राहूनच आपणास आरंभ करावयास पाहिजे. कोणताहि उद्योग निःस्वार्थी मनाने करावयाला शिकणे हा या शाळेतील पहिला धडा आहे. आपल्याला कोणतेंहि काम करण्याची इच्छा उद्भवली की तिच्यापलीकडे असणारा हेतु शोधावा. हेतूवांचून इच्छा उद्भवत नाही. इच्छा उद्भवली की तिचे स्वरूप अधिक व्यक्त असल्यामुळे हेतूपुढे पडदा आल्यासारखा होऊन तो अदृश्य होतो. तो हेतु शोधून काढून त्याचे वास्तविक स्वरूप अवलोकन करावें. पहिल्या पहिल्याने आपली प्रत्येक इच्छा स्वार्थी हेतूने प्रेरित असते असे आपणास आढळून येईल. परंतु आपल्या इच्छाशक्तीने या स्वार्थांच्या नि:पाताचा उद्योग निश्चयाने आरंभिला तर केव्हांना केव्हां तरी यश खचित येईल. या दुस्तर संसृतींतून आपला रस्ता काढित असतां हळू हळू प्रयत्न करून शेवटी सर्वथा नि:स्वार्थी बनणे हे प्रत्येकाला शक्य आहे. ज्या दिवशी आपण पूर्ण निःस्वार्थी बनूं त्या दिवशी आमचे सर्व सामर्थ्य एकवटले आहे असा प्रत्यय येऊन आपली मूळची केवळ ज्ञानमय स्थिति आपणास प्राप्त होईल.


प्रकरण २ रे


स्वकर्तव्यदक्ष प्रत्येक मनुष्य सारखाच मोठा आहे.


 सांख्यमताप्रमाणे विश्व में त्रिगुणात्मक आहे. या तीन गुणांस सत्व, रज आणि तम अशी नांवे आहेत. या तीन गुणांचें सृष्टीतील प्रत्यक्ष अथवा दृश्य स्वरूप अनुक्रमें स्थैर्य, चापल्य आणि जाड्य अशा तीन अवस्थांत दिसून येते. दगडासारखी जडावस्था तमोगुणाचे दृश्यस्वरूप आहे. रागलोभादि विकारांस वश होऊन कार्यास प्रवृत्त होणे हे रजोगुणाचे दृश्यस्वरूप आहे. या दोहोंस ताब्यांत ठेऊन त्यांच्यांत समतोलपणा उत्पन्न करणारा तो सत्वगुण.

 प्रत्येक मनुष्यांत हे तीन गुण असतात. त्यांपैकी जो गुण ज्या वेळी प्रबल असेल त्यास अनुसरून प्रत्येक मनुष्य त्यावेळी कर्म करित असतो. जेव्हां तमोगुण प्रबल असतो तेव्हां आपणास आळस येतो-आपण अगदी स्तब्ध आणि