पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

कडे जात नाही. आमच्या सभोवती दिसणाऱ्या परिघापलीकडे आणखी जग आहे ही गोष्टच आमच्या ध्यानात येत नाही. दृष्टीच्या या आकुंचितपणामुळेच आम्ही दुष्ट आणि अनीतिमान् बनलो आहों. हाच आमचा मोठा दुर्बळपणा आहे.

कर्म कितीहि हलक्या दर्जाचे असले तरी त्याचा विषाद मानूं नये. हलके कर्म झाले तरी ते शक्य तितक्या उत्तम रीतीने करण्यास शिकले पाहिजे. केवळ कीर्तीसाठी कोणी काही कर्म करित असतील तर असोत. परंतु आपले कर्तव्य करतांनां कीर्तीची दृष्टि ठेऊ नये. आपल्या स्वतःचें मानसिक सामर्थ्य वाढावें ही दृष्टि नेहमी जागृत असली पाहिजे. 'कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन' ही भगवंताची उक्ति सतत ध्यानांत वागविली पाहिजे. एखाद्याला मदत करण्याची तुम्हांस इच्छा झाली तर तो पुढे आपल्याशी कसा वागेल असल्या प्रकारचे विचार चित्तास शिवूहि देऊं नयेत. कोणत्याहि चांगल्या कार्यास आरंभ करावा असे वाटले तर तें शेवटास जाईल की नाही याची चिंता करित न बसतां कार्यास आरंभ करावा.

अशा प्रकारचे कर्म करण्याचा निश्चय केला तर एक नवीच अडचण दिसूं लागते. सदोदित कार्यरत राहावयाचा आम्ही निश्चय करूं; वस्तुत: कर्माशिवाय आमचा एक क्षणहि जात नाही. हे तुमचे ह्मणणे आह्मीं कबूल केले, तर सदोदित कार्यरत राहिल्यावर आमांस विश्रांति केव्हां मिळणार ? जगांत राहून कर्म करावयाचे झटले तर निवळ चरितार्थासाठी सुद्धा इतका उद्योग करावा लागतो की त्याखालीच आमचा चुराडा होऊन जातो. संसार सोडून अरण्यवास पत्करावा म्हटले तर तेथील शांतताहि सहन करण्याची आम्हांस मानसिक शक्ति नाही. पशुपक्ष्यांवांचून इतरांचा शब्दहि ऐकू येण्याची मारामार, अशा स्थितीत या दोन्ही स्थिति अर्धवट वाटतात. एखाद्या अरण्यवासी मनुष्याला संसारांत आणिलें तर भोंवतालच्या गडबडीनें तो बिचारा भांबावून वेडा व्हावयाचा. उलटपक्षी एखाद्या संसायाला अरण्यांत पाठविले तर तेथल्या निःसीम शांततेने तो वेड्यासारखा होतो. समुद्राच्या खोल पाण्यात राहणाऱ्या माशाला पृष्ठभागावर आणिलें तर त्याच्या शरीराचे तुकडे होतात. कारण त्याच्या शरीरावर जें पाण्याचे प्रचंड वजन असतें तें नाहींसें झाल्यामुळे त्याचे शरीर विस्कळित होते. अशी स्थिति दिसत असतां या दोहींचा योग्य संयोग करावयाचा कसा? जगांतील एकसारख्या चालू राहणाऱ्या गडबडींत ज्याला अत्यंत स्थिर राहतां येते आणि अरण्याच्या निःसीम शांततेत ज्याला अत्यंत कार्यरत राहतां येते