पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

५४

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.


अथवा दुसरा कसलाहि असो-मनांत न धरितां जर कोणी पांच दिवस किंबहुना पांच मिनिटें कर्म केले तर अशा मनुष्यांत उत्तम मानसिक धैर्याचें बीज आहे असे समजावें. अशा प्रकारचे कर्म करणे अत्यंत बिकट आहे, ही गोष्ट खरी; परंतु अशा कर्मात वसत असणाऱ्या सामर्थ्याचा प्रत्यय आपणास कधीच आलेला नसतो, असें नाही. असें कर्म करण्यासाठी जी आकलनशक्ति लागते तिची किंमत वास्तविक कर्म करण्यांत दिसून येणाऱ्या शक्तीपेक्षा अधिक आहे. कोणतेंहि कर्म करित असतां स्वार्थाचा यत्किंचितहि उदय न होऊ देण्यासाठी मनावर केवढा मोठा ताबा असावा लागतो याची कल्पना नुसत्या वर्णनाने कधींच करितां येणार नाही. स्वार्थी कर्म करण्यांत केवढेहि सामर्थ्य दिसून आले तरी त्या सामर्थ्याचे महत्व वरील प्रकारच्या आकलनांत लागणाऱ्या सामर्थ्यापेक्षां नि:संशय कमी दर्जाचे आहे. चार घोडे जोडलेली एखादी गाडी उतरणीवरून भरधाव जात असतां ती तशीच जाऊ देण्यास जें बळ लागते त्याहून ती एकदम थांबविण्यास अधिक बळ नि:संशय लागतें. एखादा गोळा तोफेंतून मोठ्या वेगाने निघाला आणि त्याच्या वाटेत कोणताच पदार्थ आड आला नाही तर बऱ्याच अंतरावर तो जाऊन पडतो व तेथे त्यांतील विनाशक शक्तीचा फारसा प्रत्यय येत नाही. परंतु तो मध्येच एखाद्या कठीण पदार्थावर आपटला तर अत्यंत परिमाणाची उष्णता तो उत्पन्न करितो. स्वार्थबुद्धीने प्रेरित होऊन आपण कोणतेंहि कर्म करूं लागलों म्हणजे आपलें जें सामर्थ्य खर्च होतें तें कोणत्याहि उपायाने आपणास परत मिळत नाही. परंतु स्वार्थबुद्धि टाकून देण्यास-मनावर ताबा ठेवण्यास-जें सामर्थ्य खर्च होतें तें मात्र किती तरी अधिक वाढून आपणांस परत मिळते. अशा रीतीने ज्याचे मन ताब्यात आले आहे, त्याची इच्छाशक्ति अत्यंत बळावत जातजात तोच पुढे ख्रिस्ताची अथवा बुद्धाची पदवी पावतो. मनुष्यमात्राने आपणापुढे नमावे अशी. पुष्कळांची इच्छा असते; परंतु शक्तीच्या वृद्धीचे हे रहस्य त्यांस ठाऊक नसते. आज अत्यंत मूर्ख असा दिसणारा मनुष्यहि हे रहस्य जाणून व त्याप्रमाणे वागून जगाचा शास्ता होऊ शकेल. आपणापुढें मनुष्यांनी नमून राहावे अशी इच्छा मात्र त्याने प्रथम समूळ टाकिली पाहिजे. ज्या दिवशी अशा इच्छेची त्यास आठवणहि नाहीशी होईल त्याच दिवशी मनुष्ये त्याजपुढे नमत आहेत असें त्यास दिसेल. ज्याप्रमाणे कित्येक प्राण्यांस कांही थोड्याशा पावलांपलीकडील जमीन दिसत नाही, त्याच प्रमाणे आह्मां मनुष्यांची नजर काही थोड्या वर्षांपली