पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

५२

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

खात्री होत जाते. एखादा मनुष्य पैसा मिळविण्यासाठी एकसारखी धडपड करित असतो. प्रसंगी कोणाची मान मुरगळण्यासहि मागेपुढे पाहत नाही; परंतु इतकें करूनहि त्यास कांहीं प्राप्ति होत नाही. आणि आयुष्य त्याला कंटाळवाणे वाढू लागते. पैसा मिळावा अशी त्या मनुष्याची योग्यताच नसते. स्वतःच्या सुखासाठी हजारों वस्तु आपण जमवून ठेवितों; परंतु त्यांतील जितक्यांचा उपभोग घडण्याची आपली पात्रता असते तितक्याच आपल्या उपयोगी पडतात. एखाद्या मूर्खाने जगांतील सर्व पुस्तकांचा संग्रह केला तरी त्यांतील जितकी वाचण्याची त्याची योग्यता असते तितक्यांचाच त्यास उपयोग होतो. ही योग्यता त्याला स्वतःच्या कर्मानुसार प्राप्त झालेली असते. आपली योग्यता काय आहे व आपणास कोणत्या गोष्टी आपल्याशा करता येतील याचा आपल्या कर्मानुरोधाने निश्चय होतो. आपली जी कांहीं आज स्थिति आहे ती आपण स्वतःच प्राप्त करून घेतली असून आपल्या इच्छेप्रमाणे वाटेल ती स्थिति प्राप्त करून घेण्यास आपणांस मोकळीक आहे. आज आपणांस जी काही स्थिति प्राप्त झाली आहे ती पूर्व कर्माचे फल असल्यामुळे पुढें प्राप्त होणारी स्थिति वर्तमान अथवा चालू कर्मानुरूप होणार हे उघड आहे. असें आहे तर कर्म कसे करावे हे समजून घेणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. 'कर्म कसे करावे यांत समजून घेण्यासारखे काय आहे ? आह्मी रोज कसे तरी कर्म करीत असतोच' असे कोणी ह्मणेल. परंतु कर्म करावें कसें; तसेंच कर्म कोणते आणि अकर्म कोणतें याचा बोध झाला नसल्यामुळे आपल्या कर्तव्यशक्तीचा दुरुपयोग होतो, व प्रसंगी तर तिचा फुकट व्यय होतो, ही गोष्ट त्याच्या लक्ष्यांत आलेली नसते. 'योगः कर्मसकौशलम् ' व ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिहार्हसि' असें भगवंतांनी गीतेत सांगितले आहे. कर्म कसे करावे हे जाणून सशास्त्र मार्गाने कर्म केले तर अत्यंत फलदायी होते. मानसिकशक्ति अव्यक्तपणांतून व्यक्तपणांत आणणे व निद्रित आत्म्यास चेतना देणे हे कर्माचें साध्य आहे, हे आपण नित्य लक्ष्यांत धरिले पाहिजे. प्रत्येक मनुष्यांत एकसारखी चिच्छक्ति निद्रित असून ती कर्मरूप आघातांनी जागृत होते.

प्रत्येक मनुष्य कर्म करूं लागला ह्मणजे तें करण्यांत त्याचा काही तरी हेतु असतो. हेतूवांचून कर्मप्रवृत्ति होत नाही. कित्येकांनां कीर्तिमान होण्याची इच्छा असते, ह्मणून कीर्तीसाठी ते कर्म करितात. दुसऱ्या कित्येकांना द्रव्य हवें असते; ते द्रव्यप्राप्तीच्या हेतूस्तव कर्म करीत असतात. कित्येकांना स्वर्गसुखाच्या प्राप्तीचा हव्यास असतो; व ते तशा दृष्टीने कर्मे करितात. कित्येक