पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

५१

कार्य हे अव्यक्त इच्छाशक्तीचें व्यक्त रूप होय. या रीतीने आपणांस दिसणारी सर्व यंत्रे, कारखाने, शहरे, आगबोटी वगैरे जिनसा मनुष्याच्या इच्छाशक्तीची दृश्यफले आहेत. मनुष्याच्या दानतीस अनुरूप अशी इच्छा उद्भवते. आणि दानत बनलेली असते. यामुळे जसें कर्म तद्वतच इच्छा हे उघड झाले. आपल्या अचाट इच्छाशक्तीने जगाचे स्वरूप ज्यांनी बदलून टाकिलें असे सामर्थ्यवान् पुरुष जबर व्यासंगी होते. सर्व जग सुलट्याचे उलटें व उलट्याचे सुलटे करावें असें सामर्थ्य युगानुयुगें कर्मे करून त्यांनी आपल्या ठिकाणी आणून ठेविले होते. भगवान् बुद्ध अथवा भगवान् येशुख्रिस्त यांची अलोट इच्छाशक्ति ही एकाच जन्मांतील कर्माचे फल नसून जन्मजन्मांतरीची कर्मफलें जी त्यांनी सांठविली होती त्यांचे एक दृश्यफळ आहे. आपणांतील विशिष्ट मनोवृत्ति आनुवंशिक संस्कारांनी आपणांस प्राप्त झाल्या आहेत असें ह्मणणारांनी बुद्ध अथवा ख्रिस्तचरिताचा विचार करावा. ख्रिस्ताचा बाप जोसेफ हा एक साधारण दर्जाचा सुतार होता. तत्त्वज्ञानाचा एक शब्दहि त्याने उच्चारिला असल्याचे कोणाच्या ऐकिवांत नाही. त्याच्यासारखे रंधापटाशी बहाद्दर आजपर्यंत अनेक होऊन गेले व आजहि अनेक आहेत. अशा साधारण दर्जाच्या सुताराच्या पोटी अर्धे जग प्रकाशमय करून सोडणारा ज्ञानदीप पेटविण्यासारखा पुत्र निर्माण व्हावा हे आनुवंशिक संस्कारांचें फल आहे काय ? बुद्धाचा बाप एक सामान्य राजा होता. स्वतःच्या नोकरांवर तरी त्यास ताबा चालवितां येत होता की नाही कोणास ठाऊक ! परंतु त्याच्या पोटी उत्पन्न झालेल्या पुत्रास ईश्वरावतार मानून अर्ध जग प्रत्यही त्याची पूजा करीत आहे. जोसेफ सुतार आणि त्याचा पुत्र या दोघांत दिसून येणारे जमीनअस्मानाचे अंतर आनुवंशिक संस्कारांच्या उपपत्तीने भरून येईल काय ? बुद्ध आणि ख्रिस्त यांनी ज्या आपल्या इच्छाशक्तीने जगांत क्रांति घडवून आणली ती शक्ति कोठून आली ? अनेक लहान लहान शक्ती युगानुयुगें एकवटत होत्या व शेवटी त्या बुद्ध व ख्रिस्त या रूपाने प्रगट झाल्या असेंच ह्मटले पाहिजे.

आपली जी काही दानत आजमितीस आहे, ती आपल्या सर्व पूर्वकर्माचा परिपाक आहे. स्वतः श्रम करून मिळविल्याशिवाय कोणासहि आयतें असें कांहींच प्राप्त व्हावयाचे नाही, असा अनादिसिद्ध नियम आहे. कित्येक वेळां अशा प्रकारचा नियम कांहींच नसावा असे वाटण्यासारख्या गोष्टी घडतात; परंतु आपली दृष्टि जसजशी शुद्ध होत जाते तसतशी या नियमाच्या अस्तित्वाबद्दल आपली