पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

५०

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

कांठी एखाद्या धक्क्या जवळ उभे असतां एखादी मोठी लाट येऊन त्या धक्क्यावर आदळते. त्या वेळी त्या लाटेनें केवढा मोठा आवाज उत्पन्न केलासें आपणास वाटते. परंतु कोट्यवधि सूक्ष्म तरंगांच्या एकीकरणाने ती लाट उत्पन्न झालेली असते; आणि आपण जो मोठा आवाज ऐकला तो त्या सूक्ष्म तरंगांच्या लहान लहान आवाजांच्या एकीकरणाचेंच फल असतो. ते सूक्ष्म आवाज स्वतंत्रपणे आपल्या प्रत्ययास येत नाहीत. अशाच रीतीने आपलें हृदय उडणे वगैरे सर्व क्रिया कर्मेच होत. कित्येक स्वतंत्रपणे आपल्या प्रत्ययास येतात; परंतु ती सर्व सूक्ष्म कर्माच्या समुच्चयाचा परिणाम असतात. कोणत्याहि मनुष्याची खरी दानत तुह्मांस समजून घ्यावयाची असली तर त्याने केलेल्या एखाद्या मोठ्या कृत्यावरून तिची बरोबर पारख होणार नाही. प्रसंगी एखादा अत्यंत कृपण मनुष्य कर्णालाहि लाजवील. परंतु अशा एखाद्या प्रसंगावरून आपण कोणाच्या दानतीचें अनुमान केले तर ते पुष्कळ वेळां चुकीचे ठरण्याचा संभव आहे. मनुष्य रोजच्या व्यवहारांत कसा वागतो, आणि बारीकसारीक गोष्टी कशा करतो याचे सूक्ष्म अवलोकन करूनच त्याच्या दानतीचे यथार्थ ज्ञान होईल. प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात काही प्रसंग असे येतात की त्या वेळी आपले लघुत्व विसरून तो काही महत्कार्य करून जातो. परंतु सर्वदा आणि सर्वकाली ज्याची वागणूक एकसारखीच मोठी असते तोच खरा मोठा मनुष्य होय.

कर्माचा मनुष्याच्या दानतीवर होणारा परिणाम पाहिला ह्मणजे कर्म ही एक अचाट शक्तीच आहे असे वाटते. प्रत्येक मानवी प्राणी हा ईश्वरांश असल्यामुळे जगांतील सर्व शक्ती जणूं काय त्याच्या ठिकाणी एकवटलेल्या असतात. व तो या शक्तीस कर्माच्या रूपाने पुन्हां जगांत फिरावयास लावतो. जेथे या सर्व शक्ती एकवटतात आणि जेथून पुन्हां कर्मरूपाने बाहेर पडून जगभर वावरतात तीच मनुष्यांतील जीवनकला होय. या चालककलेंत सर्व सामर्थ्य एकवटलेले आहे. ही कला सर्वशक्तिमति अशा स्वरूपाची असल्यामुळे गुरुत्वाकर्षणाच्या नियमाने विश्वांतील अनेक शक्ती तिच्याकडे ओढल्या जातात, आणि तिच्याभोवती फिरत राहतात. त्यांचा उपयोग करून आपल्या दानतीच्या द्वारें मनुष्य या शक्तींस बरें अथवा वाईट रूप देऊन त्यांस जगांत परत पाठवीत असतो. इतर शक्तींस आकर्षण करण्याचे जसें त्यास सामर्थ्य आहे तसेच त्यांचे रूपांतर करून त्यांस जगभर फिरावयास पाठविण्याचेंहि त्यास सामर्थ्य आहे.

जगांत जें जें कार्य आपण पाहतों तें तें सर्व मानवी विचारांचे दृश्यरूप आहे. मनुष्याची इच्छाशक्ति चित्तांत गुप्तरूपाने असते व तीच कार्यरूपाने दृश्य होते.