पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

४९


नव्हते आणि पृथ्वीच्या पोटांतील मध्यबिंदूंतहि नव्हते. सर्व ज्ञानाचे भांडार मनुष्याचें मन हेच आहे; मग तें अध्यात्मज्ञान असो अथवा लौकिकज्ञान असो. आपणांत हे ज्ञान गुप्त असते व त्यावरील पडदा हळूहळू दूर करण्याच्या उद्योगास लागलों ह्मणजे आपण शिकू लागलों असें ह्मणतो; आणि जसजसा हा पडदा अधिक दूर होऊ लागतो तसतसे आपण अधिक ज्ञानी होऊ लागतो. ज्या मनुष्याच्या ज्ञानावरील हा पडदा अधिक दूर झाला आहे तो अधिक ज्ञानी ह्मणवितो; ज्यावर तो पडदा अगदी घट्ट बसला आहे तो मनुष्य अज्ञानी आणि ज्याच्या हृदयावरील हा पडदा निखालस गळून पडला तो परमज्ञानी ह्मणजे सर्वज्ञ ह्मणवितो. आजपर्यंत असे सर्वज्ञ अनेक वेळां येऊन गेले आहेत आणि पुढेहि येतील. पुढेहि युगानुयुगी त्यांचे अवतार होणार आहेत. गारगोटीच्या पोटी अग्नि जसा गुप्तरूपाने राहत असतो तसेच सर्व ज्ञान मानवी हृदयांत वसत असतें. घर्षणानें गारेंतून जशी ठिणगी व्यक्त होते तसेच साधनांच्या घर्षणाने ज्ञान दृश्यस्वरूपास येते. हे दृश्य स्वरूप अनेकप्रकारच्या रूपांनी व्यक्त होते. आपल्या चित्तांत उद्भूत होणाऱ्या सर्व भावना, आपली सर्व -रडणे, हंसणे इत्यादि क्रिया, आनंददुःखादि मनोव्यापार, आपला क्रोध, आपलें प्रेम, स्तुति आणि निंदा इत्यादि प्रत्यही घडणाऱ्या गोष्टींचे सूक्ष्म अवलोकन केले तर कोणत्याना कोणत्या तरी साधनाच्या घर्षणाने हे नानारूप स्फुलिंग आपल्याच चित्तांत जन्म पावल्याचे आपणास आढळून येईल. या सर्वांचा समवायी परिणाम झणजे आमची दानत. या सर्वप्रकारच्या घर्षणास कर्म अथवा क्रिया असें नांव आहे. ज्या क्रियासाधनाने जीवात्म्यास घर्षण मिळून त्याचे सामर्थ्य आणि ज्ञान दृक्प्रत्ययास येतें तें सर्व क्रियासाधन कर्म या एका शब्दाने ओळखिलें जाते. या दृष्टीने विचार केला, ह्मणजे कर्म केल्यावांचून आपल्या आयुष्यातील एक क्षणहि जात नाही असे दिसून येईल. ' नहि कश्चित्क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत् । कार्यतेह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः ॥' असा सिद्धांत भगवान् श्रीकृष्णांनी गीतेत सांगितला आहे. मी बोलतों तें कर्म, आपण ऐकतां तें कर्म, आपण श्वासोच्छास करितों तें कर्म; सारांश आपण मनाने अथवा शरीराने ज्या ज्या क्रिया करितों तें सर्व कर्म असून त्यांतील प्रत्येक क्रियेचा परिणामसंस्कार-जीवात्म्यावर घडल्यावांचून रहात नाही.

अत्यंत सूक्ष्म अशा अनेक कर्मपरंपरा एकजीव होऊन एका मोठ्या रूपाने ज्यांत दृश्यमान होतात अशा प्रकारची काही कर्मे असतात. आपण समुद्र

स्वा. वि. ४