पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

४८

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.


दानतीमुळे प्रसिद्धीस आलेल्या अशा व्यक्तींचा इतिहास पाहिला तर त्यांत सुखापेक्षा दुःखप्रसंगच त्यांस अधिक भोगावे लागल्याचे दिसून येते. लक्ष्मीपेक्षां तिच्या वडील बहिणीच्या राज्यांत ज्ञानी लोक अधिक आढळतात. स्तुतीपेक्षां निंदेच्या तडाक्यानेच लोक अधिक ज्ञानी निर्माण झाल्याचा दाखला आहे. याचसाठी 'निंदकाचे घर असावें शेजारी ' अशी मागणी सत्पुरुष परमेश्वराजवळ मागतात.

ज्ञान प्रत्येक मनुष्यांत जन्मतःच वास करित असतें. ज्ञान ही कोठून बाहेरून येणारी चीज नव्हे. तिचा वास प्रत्येकाच्या अंतर्यामी सदोदित असतो. 'अमुक मनुष्याने अमुक जाणले' असे आपण सामान्य भाषेत ह्मणतों. हेच वाक्य तात्विक भाषेत बोलावयाचे झाले तर 'अमुक मनुष्याने अमुक व्यक्त केले, गूढांतून निदर्शनास आणिलें,' असें ह्मणावयास पाहिजे. जीवात्मा हा स्वभावतः ज्ञानपूर्ण व अज्ञानानें केवळ आच्छादिलेला असा आहे. हा अज्ञानाचा पडदा ज्या मानाने दूर होतो, त्या मानाने ज्ञान दृग्गोचर होऊ लागते. 'अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यति जंतवः ' ज्ञान हे अज्ञानाने आवृत्त झाल्यामुळे मनुष्यप्राणी मूर्ख असल्यासारिखा दिसतो. हा सिद्धांत नित्य लक्ष्यांत बाळगिला पाहिजे. न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा नियम शोधून काढिला असे आपण ह्मणतों. हा नियम जगाच्या कोणत्या तरी कोपऱ्यांत लपून बसला होता काय? तो न्यूटनच्या अंतर्गत ज्ञानभांडारांतच होता. त्याची बाहेर येण्याची वेळ झाल्याबरोवर एका क्षुल्लक कारणाने त्या भांडाराचे दार उघडून तो नियम बाहेर पडला. जगांत आज दृश्यमान होणारे सर्व ज्ञान मानवी हृदयांतच एके काळी वास करित होते व आतां तें व्यक्त झाले आहे. या सर्व विश्वांत मावणार नाही एवढा मोठा ग्रंथसंग्रह तुमच्या एवढ्याशा हृदयांत सांठविलेला आहे. दृश्य जग हे केवळ मनुष्याच्या अंतरंगाला जागृत करण्याचे एक साधन मात्र आहे. त्यांतून ज्ञानाची निष्पत्ति होत नसून त्यामुळे चैतन्य जागृत होऊन अज्ञानाचा पडदा फाटण्यास सुरवात होते व ज्ञान अव्यक्तांतून व्यक्तांत येते. ह्मणून ज्ञानार्जनासाठी जगाचा अभ्यास करावयाचा नसून जगरूप साधनाने मनाचा अभ्यास करणे हा ज्ञानार्जनाचा मार्ग आहे. झाडावरून एक फळ पडलेलें न्यूटनने पाहिले आणि डोळे मिटून विचार करतां करतां अनेक विचारपरंपरा त्याच्या चित्तांत त्याला दिसून आल्या. या विचारपरंपरेच्या सांखळींतील एका दुव्यास आपण गुरुत्वाकर्षणाचा नियम या नांवानें सांप्रत ओळखितो. या नियमाचे ज्ञान त्या फळांत