पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कर्मयोग.
प्रकरण १ लें.
कर्माचा दानतीवर परिणाम.

कर्म हा शब्द मूळ संस्कृत धातु कृ ह्मणजे करणे यापासून उत्पन्न झाला आहे. आपण जें जें कांहीं करतों तें सर्व कर्म होय. आपल्या हातून घडणाऱ्या कृतीचा परिपाक, असाहि कर्म या शब्दाचा दुसरा अर्थ आहे. पूर्वजन्मार्जित क्रियांचे वर्तमान फल अशा अर्थानेंहि कर्म या शब्दाचा उपयोग करितात; परंतु पुढील विवेचनांत कर्म हा शब्द चालू क्रिया या अर्थाचाच दर्शक आहे असें समजावें. पूर्णज्ञानी होणे हा मानवी संस्कृतीचा अंतिम हेतु आहे. यावांचून दुसरें साध्य कांहीं नाहीं असें प्राचीन पौर्वात्य तत्ववेत्त्यांचे मत आहे. इंद्रियजन्य सुखासाठी अनेक साधनें निर्माण करणे हे मनुष्याचे साध्य नसून, पूर्णज्ञानी होऊन स्वतः सुखरूप होणे हे साध्य आहे. जगांत दु:ख आढळून येते त्याचे कारण, मनुष्य भ्रमाने सुखसाधनें मिळविण्याच्या मागे लागतो हे होय. सुख हे साधनांतर्गत आहे असे वाटणे हा भ्रम होय. सुखाची साधनें हस्तगत करण्याचा उद्योग करित असतां मनुष्य सुख आणि दु:ख यांच्या द्वंद्वांत सांपडतो व केव्हां सुखांतून दु:खांत तर केव्हां दु:खांतून सुखांत हेलकावे खात असतांच त्याची चूक त्याच्या लक्ष्यांत येते. साधनांतर्गत सुखदु:खांचा आस्वाद घेतल्यानंतर सुख हैं वस्तुतः साधनांत नाही हे त्याच्या लक्ष्यांत येऊ लागते. हे ज्ञान होण्याकरितां सुख आणि दु:ख या दोहींचीहि सारखीच अपेक्षा आहे. सुख आणि दु:ख ही दोन्ही साधनांतर्गत असल्यामुळे चिरस्थायी नसून कांहीं कालाने ती नष्ट होतात असा त्यास अनुभव येतो. तथापि सुख अथवा दु:ख नष्ट झाले तरी त्यांचा कांहीं परिणाम जीवात्म्यावर कायमचा राहतो. सुख अथवा दु:ख आले कसे आणि नष्ट झाले कसें याचे ज्ञान कायम स्वरूपाचे असून ते ज्ञानरूपाने जीवात्म्याच्या ठिकाणी कायम राहून त्याच्या वागणुकीत दिसू लागते. मनुष्याच्या सामान्य व्यवहारांत प्रतिबिंबित झालेल्या या ज्ञानास दानत असें ह्मणतात. सुखदुःखांचा अनुभव घेत असतां मनुष्याच्या मनोवृत्ती निरनिराळे वळण घेत असतात व या निरनिराळ्या मनोवृत्ती एकत्र मिळून त्यांची दानत बनत असते. ही. दानत बनविण्यांत सुखाचा व दु:खाचा सारखाच उपयोग आहे; किंबहुना कित्येक वेळां तर सुखापेक्षां दु:खामुळे होणारी ज्ञानप्राप्तीच अधिक दर्जाची असते. जगांत विशिष्ट