पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

४२

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.


शरीर आणि मन यांहूनहि निराळे असले पाहिजे असे उघड दिसतें. तें साधन आत्मा हे होय. स्वातंत्र्य आणि अत्यंत पारतंत्र्य यांच्या मिश्रणाने हे जग बनले असून अत्यंत स्वतंत्र, पूर्ण आणि पवित्र असा परमात्मा सर्व विश्वाच्या द्वारें व्यक्त झाला आहे असें वेदांनी सांगितले आहे. त्याला मृत्यु नाही, कारण मृत्यु ह्मणजे नष्ट होणे नसून एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत जाणे होय. तो अत्यंत पूर्ण असल्यामुळे स्वतंत्र आहे. अपूर्णता असणे ही एक विशिष्ट परिस्थिति आहे; आणि आत्मा परिस्थितीने मर्यादित नसतो. हाच पूर्ण आणि स्वतंत्र परमात्मा थेट ईश्वरापासून तों अगदी हलक्या भिकाऱ्यापर्यंत सर्वांत एकसारखाच आहे, यांत जो फरक दिसतो त्याचे कारण तो परमात्मा व्यक्त होण्याच्या साधनांत असणारा फरक हे होय.

परंतु आत्म्याने शरीर का धारण करावे, असा प्रश्न निघतो. त्याचे कारण असें, की माझें मुख पाहावयास जसा मी आरसा घेतों, तद्वत् स्वतःचे प्रतिबिंब परमात्म्यास शरीरधारी जीवात्म्यांत दिसते. जीवात्मा हा परमात्म्याचे प्रतिबिंब आहे आणि केव्हांना केव्हां तरी जीवात्मा आपल्या मूळच्या स्वरूपास प्राप्त होईलच होईल. मी एखाद्या अंधाऱ्या जागेत जाऊन कितीहि कोरडी ओरडाओरड केली तरी प्रकाशाची प्राप्ति मला होणार नाही. त्यासाठी एक काडी पेटविली की अंधार आपोआप नाहीसा होतो. तसेंच 'मी पापी, मी पापी' ह्मणून आपण कितीहि रडलों तरी त्याचा उपयोग काय? त्यामुळे आपण आपल्या अपूर्णस्थितीतून निघून पूर्णत्वास जाऊं असा यत्किंचितहि संभव नाही. याकरितां आपलें मूळस्वरूप काय हे ओळखून त्याचे तेज फांकेल असा यत्न करा असें वेद अनादिकालापासून सांगत आहेत. आतां यापुढे 'मी पापी' अशी प्रार्थना करण्यास मुलांस शिकवू नका. धर्म ही कांहीं तरी मूर्खपणाची कवाईत नाही. परमेश्वरप्राप्तीचा तो निश्चित मार्ग आहे, ही गोष्ट त्यांच्या मनावर ठसवा. एखादें दुःख प्राप्त झाले ह्मणजे 'अरे परमेश्वरा' ह्मणणे, हा धर्म नव्हे. आपले संपूर्ण तेज फांकेल अशा रीतीने प्रत्येक कार्यात आपली वर्तणूक ठेवणे, हा धर्म आहे.

प्रत्येक मनुष्याचा वर्तमान आणि भविष्य आयुःक्रम पूर्वक्रियेवर अवलंबून असन चालू जीवित हे पूर्व क्रियेचें फळ आहे; याबद्दल सर्व धर्माचे एकमत आहे. एक मूल चांगल्या आईबापांच्या पोटी जन्मास येऊन चांगले शिक्षण मिळविते आणि श्रीमान् होते. दुसरे मूल भिकाऱ्याच्या पोटी येऊन जन्मभर भिकारी राहते. न्यायी परमेश्वरावर या विसदृशतेचे खापर फोडणें अनुचित