पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

४३

आहे. तर मग हे भेद आले कोठून ? तसेंच सध्याचा माझा जन्म पहिलाच आहे, असें मानिले तर माझें मूळचे स्वातंत्र्य नष्ट होऊन मी परिस्थितीने बांधला जातों; असें कां व्हावें ? माझें स्वातंत्र्य का हरण झालें ? जर माझ्या चालू आयुःक्रमांत पूर्वक्रियेचे अनुभव उपयोगी पडत नाहीत असें मानिलें तर सर्व आयुष्य मला लोकांच्या तोंडाकडे पाहून कंठावें लागेल याची वाट काय ? पूर्वानुभवशून्य असा मी स्वतंत्रपणे कांहीं करूं शकेन असा संभव तरी आहे काय ? आणि मला स्वतःच्या स्वतंत्र क्रियेने वागतां आलें नाहीं तर मी अत्यंत परतंत्र असा प्राणी झालों नाही काय ? या सर्व प्रश्नांचे उत्तर वेद असें देतात, "तूं पूर्वकर्मानुरूप चालू कालांत जन्मास आला आहेस. पूर्वकर्मानुभवाचा फायदा घेऊन युक्त कर्मे करून दु:खमुक्त होण्याची तुला पूर्ण मुभा आहे." हीच आमची पुनर्जन्ममीमांसा आहे. प्रत्येक जन्मीं सत्कर्मानुरत राहून अधिक चांगले होत होत आपणास शेवटी मुक्त होतां येतें.

परमात्मा विश्वव्यापी, अमर्याद, आणि सर्वशक्तिमान् असून जीवात्माहि शेवटी त्याच पदास पोहोचतो असे आमचें हिंदुमत आहे. परमेश्वर हा विश्वबाह्य आणि आमी त्याच्या कृपेंत राहणारे जीव अशी कल्पना उत्पन्न होणे, ही प्रथम पायरी; नंतर आमच्या अंतर्यामी त्याचा वास आहे असा अनुभव येणे, ही दुसरी, आणि आम्ही आणि तो एकच ही तिसरी व शेवटची पायरी आहे. सर्व धर्म ईश्वरस्वरूपाकडेच जाण्याचे निरनिराळे मार्ग असल्यामुळे खरे आहेत. या करितां क्रुसापुढे गुडघे टेंकणारा ख्रिस्ती, मशिदीत प्रार्थना करणारा मुसलमान आणि अग्निपूजक पारशी हे सर्व सारखेच धार्मिक आहेत असे आह्मां हिंदूंस वाटते. हे सर्व प्रयत्न एकाच्याच प्राप्तीकरितां असून निरनिराळ्या परिस्थित्यनुरूप एकाच धर्माची अनेक रूपे आहेत. ही कल्पना पूर्णपणे पटली ह्मणजे धर्मद्वेषास जागाच उरत नाही. तरी सर्व धर्मानी दिलेल्या या सुंदर फुलांस एकत्र करून प्रेमसूत्राने बांधून तो झेला आपण परमेश्वरास अर्पण करू या.

जर मी खरोखर परमेश्वरस्वरूप आहे तर माझा जीवात्मा हा परमात्म्याचे देऊळ आहे हे मी निरंतर लक्ष्यात ठेवून परमात्म्याच्या ठिकाणी निर्व्याज प्रेम करणें-कर्तव्यदृष्टीने सर्व कर्मे करणे हे माझें कर्तव्य आहे. यांत बक्षिसाची आशा अथवा शिक्षेची भीति बाळगून वागणे हे अयुक्त आहे. धर्म ह्मणजे केवळ निरर्थक बडबड आणि कवाईत नसून स्वतः परमात्मरूप होण्याचा तो मार्ग आहे असें माझा धर्म मला सांगतो."