पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

४१


माझा धर्म अमुक आणि तुमचा धर्म अमुक असा भेद करणेहि योग्य नाही. हिंदुधर्मावर जितका माझा तितकाच तुमचाहि हक्क आहे. हिंदुस्थानच्या वस्तीत वीस लक्ष ख्रिस्ती, सहा कोटी मुसलमान आणि बाकी सर्व हिंदु आहेत.

हिंदूंचा धर्म वेदप्रणित आहे. जगांतील सर्व धर्माचे सार, आमच्या मतांप्रमाणे वेदांतर्गत आहे. तथापि सर्व सत्य केवळ वेदांतच आहे असे आमचे ह्मणणे नाही. 'आत्मा अमर आहे' असें वेदांनी आमांस सांगितले आहे. कोणत्याही काली आणि कोणत्याही स्थली मनुष्यमात्राची सर्व खटपट कोठे तरी स्थिर जागा शोधण्यासाठीच चाललेली असते. केव्हांहि नष्ट न होणारी अशी सुखभूमि सांपडावी हाच त्याच्या धडपडीचा हेतु असतो. एकंदर सृष्टीचे अवलोकन केले तर दृश्य सृष्टीत अशी जागा सांपडेल असा भरंवसा आपणांस वाटत नाही. प्रत्येक क्षणीं बदलत असणाऱ्या या दृश्य जगांत स्थिर जागा सांपडणार कशी?

परंतु यावरून अशी जागा कोठेच नाही असे कोणी ह्मणेल तर तो मात्र त्याचा भ्रम आहे. अशा भ्रमाचे पर्यवसान नेहमी चार्वाकवादांत होतें. 'भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः' असें ह्मणून 'ऋणं कृत्वा घृतं पिबेत् ' असा चार्वाकाने आपल्या अनुयायांस उपदेश केला आहे. त्याच्या मताप्रमाणे आत्मा, धर्म, मन इत्यादिकांचे अस्तित्व वंध्यापुत्राच्या कथेसारखें आहे. पंचज्ञानेंद्रियांनी आत्मा वस्तुतः बद्ध नाही असें वेदांताचे मत आहे. या इंद्रियांच्या द्वारें वर्तमान अथवा चालू कालाचे ज्ञान होते, ही गोष्ट आपल्या नित्य अनुभवाची आहे. तसेच त्यांच्या द्वारें भूत व भविष्यकालाचे ज्ञान होत नाही, ही गोष्टहि अनुभवसिद्ध आहे. कालाच्या एकतानतेंत हा भेद वास्तविक नसून तो केवळ इंद्रियजन्य आहे. जर भूत, वर्तमान आणि भविष्य हे काल वास्तविक अलग असते—यांतील भेद खरा असता-आणि भूतकालाचे ज्ञान वर्तमानांत आणण्याचे कोणतेच साधन उपलब्ध नसते तर आपणास वर्तमानाचें ज्ञानहि झाले नसते. यावरून या त्रिकालास जोडणारे इंद्रियातीत असें कांहीं तरी स्वतंत्र साधन असले पाहिजे, हे उघड होते.

परंतु स्वतंत्र साधन ह्मणजे काय याचा विचार येथे करणे अवश्य आहे.आपले शरीर पाहिले तर भोवतालच्या परिस्थितीची गुलामगिरी त्याने पूर्णपणे पत्करलेली दिसते. मन स्वतंत्र ह्मणावें तर तें विचारांचे बांधलेले आणि विचारांची उत्पत्ति बाह्यसृष्टीवर अवलंबून असणार ! तेव्हां असें स्वतंत्र साधन