पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३८

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.


छाती पिटण्यांत कांही फायदा नाही. मुकाट्याने एक काडी ओढली म्हणजे अंधार कोठे शोधूनहि सांपडत नाही. आपल्या चैतन्यास चालन द्या, अंतःकरण पवित्र करा म्हणजे पाप कोठेच नव्हतें असें तुम्ही म्हणूं लागाल. पापी, पापी, म्हणून कंठशोष न करतां आपण ज्या मूळस्वरूपाचे आहों त्या स्वरूपाचें चिंतन करा.

[व्याख्यान संपल्यानंतर पुढील प्रश्नोत्तरे झाली.]


एक श्रोताः- स्वामी, नरकयातनांचे वर्णन करून मनुष्याच्या चित्तांत भय उत्पन्न झाल्याशिवाय तो सन्मार्गवर्ति राहणार नाही. उपदेशकाचा आपल्या श्रोत्यांवर दाब राहिला पाहिजे.

स्वामीः- अशा रीतीने खोटी भीति दाखवून धर्मप्रेम उत्पन्न करण्यापेक्षा परमेश्वरस्वरूपाची ओळख श्रोत्यास करून देणे आधिक चांगलें. कारण, केवळ भीतीमुळे जो मनुष्य सदाचरणी बनलेला असतो तो केवळ ढोंगी असतो. भीतीचें कारण संपल्याबरोबर तो अधिक उच्छृखल होण्याचा संभव असतो.

श्रोता:- 'आकाशाचे राज्य या लोकी नाही' असें भगवान् ख्रिस्त ह्मणाला त्याचा अर्थ काय ?

स्वामीः- स्वर्गाचे राज्य आपल्याच अंतरंगांत आहे असें भगवानाने सांगितले. या पृथ्वीवर आपणांस स्वर्गातले भोग प्राप्त होतील अशी यहूदी लोकांची कल्पना होती ती खोटी असें भगवानाने सुचविले आहे.

श्रोता:- उत्क्रांतीने आपण चतुष्पादांचे मनुष्यप्राणी झालों असें ह्मणतात. आपला या मतावर विश्वास आहे काय ?

स्वामीः- उत्क्रांतीनें चतुष्पादांतून मनुष्यस्थितीपर्यंत येतां येईल, असे माझे मत आहे.

श्रोताः- ज्याला स्वतःचे पूर्वजन्म समजतात असा कोणी सत्पुरुष आपण पाहिला आहे काय ?

स्वामीः- होय. इतक्या प्रतीची इच्छाशक्तीची वाढ झालेले लोक माझ्या अवलोकनांत आले आहेत.

श्रोता:- क्रुसावर खिळून यहुद्यांनी ख्रिस्ताचा जीव घेतला, यावर आपला विश्वास आहे काय?