पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

३५


तोंडाने नुसती काही विशेष प्रकारची बडबड केली ह्मणजे मुक्ति मिळेल असें कोणी ह्मणतात; परंतु नुसत्या बाह्य कृतीने परमश्वेर मिळेल असे कोणत्याहि महात्म्याने आजपर्यंत केव्हांहि सांगितले नाही. मुक्ति मिळण्यासाठी बाहेरून कोणतीहि साधने आणावी लागत नाहीत. ती आपल्याच अंतरंगांत आपणास शोधिली पाहिजेत. अंतर्बाह्य परमेश्वरच भरून राहिला आहे, ही गोष्ट आपणास अनुभवानें पटावी लागते. बाह्य आचार अगदीच निरुपयोगी आहेत असें माझें ह्मणणे नाही; परंतु त्यांचा उपयोग केवळ आरंभी असून पुढे लवकरच ते निरुपयोगी होतात. धर्म हे पुस्तकांमुळे अस्तित्वात आलेले नसून धर्मानंतर पुस्तकें झाली आहेत, हे आपण विसरता कामा नये. कोणत्याहि पुस्तकानें परमेश्वरास उत्पन्न केलें नसून सर्व मोठे ग्रंथ परमेश्वराच्या प्रेरणेने झाले आहेत. तसेंच आमच्या जीवात्म्याचे अस्तित्वहि पुस्तकांवर अवलंबून नाही, ही गोष्ट प्रत्येक मुमुक्षुने नेहमी लक्षात ठेविली पाहिजे. जीवात्मा आणि परमात्मा यांचे ऐक्य स्वतः अनुभविणे हे सर्व धर्माचे ध्येय आहे. हाच विश्वधर्म होय. कल्पना आणि मार्ग निरनिराळे झाले तरी शेवटी त्या सर्वांची भेट होण्याचे ठिकाण एकच आहे. सर्व धर्माचा एकच पाया कोणता ह्मणून कोणी विचारिलें तर परमेश्वराशी ऐक्य' या शब्दांनी त्या प्रश्नाचें मी उत्तर देईन. एखाद्या वर्तुळाच्या परिघापासून मध्यबिंदूपर्यंत काढिलेल्या रेषा जशा मध्यबिंदूंत एकत्र व एकजीव होतात तसेंच सर्व धर्मानी सांगितलेले निरनिराळे मार्ग परमेश्वरस्वरूपांत एकत्र व एकरूप होतात. इंद्रियांनी अनुभवास येणाऱ्या व खऱ्या दृष्टीने केवळ छायेसारख्या असणाऱ्या या जगापलीकडे असलेल्या परमात्म्याचा अनुभव आला ह्मणजे आपण कोणत्या उपायांनी हे साध्य केले हा प्रश्न महत्वाचा नाही. तुम्ही कोणतीहि विशिष्ट मते मान्य करा अथवा करूं नका; एखाद्या पुस्तकानें आंखून दिलेल्या मर्यादेत राहा, अथवा राहूं नका; एखाद्या विशिष्टपंथाचे ह्मणवा अथवा ह्मणवू नका, परंतु कोणत्याहि मार्गाने परमेश्वराचे अस्तित्व स्वतःच्या ठिकाणी तुह्मी अनुभविलें ह्मणजे तुमचे काम झाले. एखादा मनुष्य, जगांत अस्तित्वांत असणाऱ्या सर्व धर्मावर मी विश्वास ठेवितों असें ह्मणेल, जगांतील सर्व धर्मग्रंथ त्यास मुखोद्गत असतील, जगांतील सर्व तीर्थात त्याने स्नान केले असेल, आणि इतके करून परमेश्वराबद्दल अगदी पुसट कल्पनाहि त्यास न होणे संभवनीय आहे. तसंच साऱ्या जन्मांत एखादें देऊळ नजरेनेंहि न पाहतां किंवा धर्मपुस्तकांत सांगितलेला एखादाहि विधि न करतां परमेश्वराचा अंतरंगांत अनुभव होणे