पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३४

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

 रोधी अशी वचनें एकाच ग्रंथांत आढळतात. 'स्वर्ग तुमच्या हृदयांतच आहे' असें ख्रिस्ताने एके ठिकाणी सांगितले आहे, तर दुसरे ठिकाणी 'आपला पिता जो अकाशांत आहे,' असें तो ह्मणतो! ही वचनें परस्पर अगदी विरोधी दिसतात. यांची एकवाक्यता होणे शक्य आहे काय ? ही वाक्ये तो कोणत्या निरनिराळ्या प्रसंगी वोलला याचा विचार केला पाहिजे. ज्यांना धर्मज्ञान मुळीच नाहीं, धर्माची सामान्य मूलभूत तत्वे ज्यांच्या कधी कानांवरूनहि गेली नाहीत, अशा मनुष्यांस 'परमेश्वर अंतराळांत आहे ' असेंच सांगणे इष्ट आहे. आपणापुढे असलेल्या श्रोत्यांचा अधिकार बरोबर ओळखून त्यांस समजेल अशा भाषेनें उपदेश करणे हे सद्गुरूचे कामच आहे. सामान्य मनुष्याला प्रत्यक्ष पदार्थांच्या साहाय्यानेच उपदेश केला पाहिजे. अतींद्रिय ज्ञान त्याच्या डोक्यांत शिरणेच शक्य नाही. एखादा मनुष्य लौकिकदृष्टीने मोठा पंडित असेल, पण त्याचे धर्मज्ञान पाहिले तर एखाद्या लहान मुलास शोभण्यासारखे असण्याचा संभव आहे. इंद्रियजन्य सुखाचा अभिलाष सुटतां सुटतां जो मनुष्य इंद्रियांच्या पलीकडे पोहोचला आहे, त्याला 'आकाशाचें राज्य स्वतःच्या अंतःकरणांतच आहे' ही गोष्ट बरोबर पटेल. स्वतःचे अत्यंत पवित्र अंतःकरण ह्मणजे 'आकाशाचें राज्य ' ही गोष्ट तो अनुभवाने समजण्याच्या स्थितीत असतो. याकरितां एकाच धर्मपुस्तकांत परस्परविरोधि वचनें आढळली तर ती निरनिराळ्या अधिकाराच्या व्यक्तीकरतां असतात, असे समजावे. तसेच प्रत्येक मनुष्य आपापल्या धर्माप्रमाणे वागतो ह्मणून त्यास दोष देणेहि वाजवी नाही. अधिकारपरत्वे कित्येकांस मूर्ति अथवा दुसरी कांहीं चिन्हें यांचा उपयोग करावा लागेल. मनुष्याच्या अंतरंगाशी बोलण्याची ती एकप्रकारची भाषाच आहे.

 आतां दुसरी एक गोष्ट विशेषेकरून तुमच्या चित्तावर ठसली पाहिजे ती ही की, अमुक मते आपण स्वीकारली किंवा एखाद्या धर्मपुस्तकांत सांगितलेल्या कवाइती आपण बरोबर केल्या तर तेवढ्यानेच आपण धार्मिक झालों असें होत नाही. तुह्मीं कोणती धर्मपुस्तकें वाचितां अथवा कोणत्या मतांवर विश्वास ठेवतां ही बाब यत्किचिहि महत्वाची नसून तुह्मी वाचतां त्यांतले स्वत:च्या ठिकाणी तुम्ही काय अनुभविले आहे, हे पाहणे महत्वाचे आहे. 'ज्यांचे अंतःकरण पवित्र आहे ते धन्य होत; कारण ते परमेश्वरास पाहतील.' असें जें बायबलांत ह्मटलें तें सर्वथैव खरे आहे. होय, याच जन्मांत त्यांस परमेश्वर खचित भेटेल. यालाच मुक्तस्थिति असें ह्मणतात. काही विशिष्ट मंत्र म्हटले अथवा