पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३२

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

लागला आहे. या जुन्या कल्पना नष्ट होत होत आतां पूर्णपणे नाहीशा होणार अशी चिन्हें दिसू लागली आहेत. पृथ्वीवर सध्या जे मुख्य धर्म दिसत आहेत ते शेंकडों वर्षे वाढत असलेल्या वृक्षाची फळे आहेत. त्यांतला एकहि धर्म आकाशांतून पडून पृथ्वीवर सांवरला असें नाही. त्यांपैकी प्रत्येकाची अनेक पुण्यपुरुषांनी थोडी थोडी जोपासना करून त्यास सांप्रतच्या दर्शनीय स्वरूपास आणिलें आहे.

 यानंतर सर्वशक्तिमान् व सर्वज्ञ अशा परमेश्वराची कल्पना उदयास आली. या सर्व विश्वाचा चालक एकच परमेश्वर आहे. या कल्पनेचा उदय झाला. हा परमेश्वर विश्वाच्या बाहेर कोठे तरी अंतराळांत राहतो अशी समजूत झाली. ही कल्पना ज्यांनी प्रथम प्रचारांत आणिली, त्यांनी स्वतःच्या लहरीप्रमाणे त्या परमेश्वराचे स्वरूप अनेक प्रकारचे कल्पिलें आहे. त्याला उजवें आणि डावें अंग आहे असे कोणी सांगतात, इतकेच नव्हे तर त्याच्या हातांत एक पक्षी आहे अशीहि कोणाची कल्पना धांवते; तथापि एवढी गोष्ट खरी की, निरनिराळ्या जातींचे निराळे देव नाहीसे होऊन त्यांऐवजी एका विश्ववाह्य देवाची योजना केली गेली तरी येथपर्यंत देवाचे अस्तित्व विश्वबाह्य होते. पुढे ही कल्पनाहि बदलत जाऊन अंतर्यामी आणि सर्वव्यापी परमेश्वराची कल्पना तिच्या जागी आली.

 'आमचा पिता, जो आकाशांत राहतो' असें एक वाक्य नव्या करारांत आहे, याचा अर्थ, परमेश्वर मनुष्यांहून निराळा असून अंतराळांत कोठे तरी राहतो, असा होतो; परंतु यापुढे ही कल्पना थोडी बदलून तिच्याऐवजी परमेश्वर अंतराळांत आणि पृथ्वीवर राहतो अशी कल्पना आढळते. हिंदुतत्वज्ञानांत परमेश्वराचे अस्तित्व मनुष्यांत असल्याचे सांगितले आहे; इतकेच नव्हे तर हिंदूंचा अद्वैतवाद याच्याहि पुढे जाऊन पूजक मनुष्य आणि पूजनीय परमेश्वर हे एकच आहेत असे सांगतो. पूजक मनुष्य ह्मणजे परमेश्वरानेच घेतलेले एक सोंग आहे. जें जें सत्य ह्मणून माझ्या ठिकाणी आहे तें तें परमेश्वराचे स्वरूप आहे, आणि परमेश्वर स्वरूपांत में सत्य तेंच माझ्या ठिकाणी व्यक्त झाले आहे असें पूजक शेवटी ह्मणूं लागतो. परमेश्वर आणि मनुष्य यांतील जमीन अस्मानाचें अंतर याप्रमाणे कमी होत जाऊन शेवटी मनुष्य आणि परमेश्वर एक झाल्याचे आढळून येतें. परमेश्वरास जाणले असतां आकाशांतील परमेश्वर आपल्याच अंतर्यामी आहे असा अनुभव येतो.