पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३०

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

कानांनी जें स्वर ऐकिले त्यांच्या अनुभवाची पुनरावृत्ति होय. कोणीहि मनुष्य नवीनच सतार वाजविण्यास शिकत असतो तेव्हां प्रत्येक पडदा दृष्टीने पाहून आणि पूर्वीच्या अनुभवाचे स्मरण करून त्यास त्या अनुभवाप्रमाणे बोटे ठेवावी लागतात. बऱ्याच कालाच्या प्रयत्नाने शेवटी त्याच्या बोटांस इतकी संवय लागते की, ती योग्य पडद्यांवरून आपोआप फिरूं लागतात. ही क्रिया इतक्या साहजिक रीतीने आणि झपाट्याने होते की, आपण पूर्वीच्या अनुभवाच्या-ज्ञानाच्या स्मरणाने वाजवित आहों ही गोष्ट खुद्द वाजविणाराच्याहि लक्ष्यांत येईनाशी होते. त्याचप्रमाणे आपणा मनुष्यांमध्ये जे कित्येक संस्कार अथवा मनोवृत्ति जन्मतःच आढळतात, त्या पूर्वीच्या संवयींमुळे उत्पन्न झालेल्या असतात. एखाद्या तान्ह्या मुलांतहि विशिष्ट मनोवृत्ति असल्याचे आपल्या नेहमी अनुभवास येते; या मनोवृत्ति कोठून उत्पन्न होतात ? या जन्मींचा अनुभव ह्मणावा तर ते बिचारें आपल्या खोलीतूनहि पुरते बाहेर गेलेले नसते. यावरून मूल जन्मास येते तेव्हां अगदी कोऱ्या मनाने येते असे वाटत नाही. पूर्वानुभवजन्य अशा विशिष्ट मनोवृत्ति ते बरोबर घेऊन येतें असें ह्मणावे लागते.

 प्रत्येक मुलास विशेष मनोवृत्ती जन्मत:च असतात, ही गोष्ट जुन्या ग्रीक आणि इजिप्शियन तत्त्ववेत्त्यांना मान्य होती. पूर्वजन्मी त्याने जी कृत्ये केली त्यांचाच परिपाक मनोवृत्तींत होऊन नव्या जन्माबरोबर त्या पुन्हां व्यक्त होऊ लागतात. पुनर्जन्म आहे असें मानिल्यावांचून या प्रश्नाचा समाधानकारक निकाल लागणे शक्य दिसत नाही. अत्यंत हट्टी अशा चार्वाकमतवाद्यालाहि पुनर्जन्म कबूल करणे भाग पडेल. पूर्वकाली होऊन गेलेल्या अनेक महात्म्यांस आणि तत्त्ववेत्त्यांस पुनर्जन्माची कल्पना मान्य होती. खुद्द येशु ख्रिस्ताला ही कल्पना मान्य होती. ख्रिस्त ह्मणतो “ पूर्वीचा जो आब्राहाम तोच मी. ” ( Before Abraharn was, I am.)

 हल्ली निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळ्या स्वरूपाने ज्या अनेक धर्माची वाढ झाली आहे त्यांचे जन्मस्थान आशियाखंड आहे आणि त्या धर्मातील भावार्थ आशियांतील लोकांस जितका चांगला समजतो तितका तो इतरांस कळत नाही. हे धर्म आशियांतून बाहेर इतरत्र संचार करूं लागल्यानंतर त्यांत चुकीच्या मतांची भेसळ झाली. ख्रिस्ती धर्मातील अत्यंत उदार आणि उच्च तत्त्वे यरोपियन लोकांस कधीच नीटशी समजली नाहीत. बायबल प्रथम ज्यांनी लिहिले त्यांनी ज्या कल्पना प्रचलित करण्याचा यत्न केला व कित्येक वेळां त्यांकरितां