पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

झाला-त्याला आरंभ झाला असें मानिले तर मनुष्यांत दृष्टोत्पत्तीस येणाऱ्या पापवृत्तीचा सर्व बोजा परमात्म्याच्या-ईश्वराच्या डोक्यावर बसतो! अत्यंत पवित्र परमेश्वराने पापी मनुष्यांस जन्म दिला असें ह्मणणे भाग पडतें ! जर जगांत दिसणाऱ्या पापाचा मूळ कर्ता परमेश्वर असता तर जगांतील सर्व व्यक्ति एकसारख्या दुःखी असावयास पाहिजे होत्या. अत्यंत न्यायी अशा परमेश्वराच्या राज्यांत त्यानेच उत्पन्न केलेल्या जीवांस कमी अधिक शिक्षा व्हावी हे योग्य आहे काय ? लक्षावधि लोक प्रत्यहीं पायाखाली केरासारखे तुडविले जावे, हजारों निरपराधी लोक क्षुधेला बळी पडावे, या गोष्टी किती चमत्कारिक आहेत ! मनुष्यप्राणी आपल्या कर्मानुरूप दु:ख भोगित नाही, असें ह्मटलें तर या सर्व दुःखाचे जनकत्व परमेश्वराकडे येते ! तर, जगांतील दिसणाऱ्या दु:खास ज्याचा तो कारण आहे हेच ह्मणणे युक्तीस धरून आहे. कर्म करणारा जर मी तर त्यापासून उत्पन्न होणाऱ्या फलाची जबाबदारी माझ्याच माथीं मारावयास नको काय? दु:खोत्पत्ति होणारी कर्मे जशी मला करतां येतात तशीच सुखोत्पादक कर्मे करण्याचीहि मला पूर्ण मुभा आहे. कोणतेंहि कर्म करण्यास अथवा न करण्यास मी पूर्ण स्वतंत्र आहे. मला कर्म करण्यास लावणारा असा कोणीहि नाही ही गोष्ट आपण नित्य लक्षांत बाळगिली पाहिजे. या करितांच नशीब अथवा दैव असे जे शब्द वारंवार आपण ऐकतों ते अगदी अर्थशून्य आहेत हे आपल्या लक्षात आलेच असेल. कोणतेंहि बरें अथवा वाईट फळ मिळत असले तर ते आपल्याच कृतींतून आपल्याच इच्छेनें निर्माण झाले आहे, हा निश्चित सिद्धांत समजावा. याकरितां दु:ख भोगणे अथवा त्यांतून मुक्त होणे हे सर्वथा माझ्याच इच्छेवर अवलंबून आहे. “ सुखस्य दुःखस्य न कोऽपि दाता । परो ददातीति कुबुद्धिरेषा ॥" हा सिद्धांत मनुष्यमात्राने सदैव थ्यानांत बाळगिला पाहिजे.

 पुनर्जन्माच्या मताविषयी जे काही मी आतां सांगणार आहे त्याकडे विशेष लक्ष्य पुरविण्याची मी आपणास विनंति करितो. आपणास कोणत्याहि पदार्थाचें जें ज्ञान होतें तें अनुभवजन्य असते; आणि ज्याला आपण अनुभव ह्मणतों त्या स्थितीचे वास्तविक स्वरूप ह्मणजे स्मरण होणे हे होय. अनुभव आणि स्मरण हे वस्तुतः समानार्थक शब्द आहेत. उदाहरणार्थ, एखादा मनुष्य सतार वाजवित असतो त्यावेळी कोणत्या पडद्यावर बोट ठेविलें ह्मणजे कोणत्या स्वराची उत्पत्ति होते याचे स्मरण त्यास असते. त्यासच आपण ज्ञान ह्मणतों. हे ज्ञान पूर्वी