पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२८

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

जीवात्म्यासंबंधी जशा या कल्पना प्रचलित झाल्या तशाच दुसऱ्या प्रकारच्या कांही कल्पना त्याच्या पूर्णत्वासंबंधी प्रचलित झाल्या. आत्मा हा स्वतः पूर्ण आहे. हे त्याचे पूर्णत्व नव्या करारासही मान्य आहे. मनुष्य हा आरंभी पूर्ण होता, आणि आपल्या वाईट कृत्यांनी पापी झाला; परंतु पुण्यकृत्यांनी, पुन्हां त्याची मूळची पदवी त्यास प्राप्त होईल असें नवा करार सांगतो. इतर कित्येक धर्मातून हीच गोष्ट, केव्हां गोष्टींच्या, केव्हां रूपकांच्या आणि केव्हां विशिष्ट खुणांच्या रूपानें सूचित केली आहे. या सर्व गोष्टींचे आणि रूपकांचे आपण पृथक्करण केले तर आपणास असे आढळून येईल की, जीवात्मा हा स्वभावतः पूर्ण असून त्यास त्याचे पूर्वीचे पावित्र्य पुन्हां मिळविता येईल, ही गोष्ट सर्वांस संमत आहे. ही गेलेली पूर्णता पुन्हां कशी मिळविता येईल अशा प्रश्नास “ परमेश्वरास जाणल्याने. ” हे उत्तर सर्व धर्मानी दिले आहे. पुत्राची ( येशूची ) भेट घेतल्याशिवाय परमेश्वराची भेट होणार नाही, असें बायबलांत ह्मटले आहे. यावरून परमेश्वराची भेट करून देणे हेच प्रत्येक धर्माचे साध्य-ध्येय-आहे असें ह्मणतां येईल. परमेश्वराच्या भेटीचे मार्ग त्यांनी निरनिराळे सांगितले असतील ही गोष्ट स्वतंत्र आहे. वर बायबलांतील वचन दिले त्याचा वास्तविक अर्थ असा आहे की पुत्रास शोभण्यासारखी कृति करावी तेव्हां पित्याची भेट होते. आपल्याच कृतीने मनुष्य अवनत झाला आहे हे ह्मणणे विशेषतः प्रत्येकानें ध्यानात ठेविलें पाहिजे. ज्या ज्या वेळी आपणावर दु:खदायक प्रसंग येतात, त्या त्या वेळी आपल्याच कर्माचा हा परिपाक आहे ही गोष्ट ध्यानांत आणून परमेश्वरास दोष देऊ नये. याच कल्पनांशी अत्यंत संयुक्त अशी पुनर्जन्माची कल्पना प्रसार पावली होती. परंतु युरोपियन लोकांनी तिची पुढे मोडतोड केली.

 तुमच्यांपैकी कित्येकांच्या कर्णपथावरून ही कल्पना गेली असेल आणि कित्येक वेळां तुह्मी तिची उपेक्षा केली असेल. आत्म्याच्या अमरत्वाच्या कल्पनेच्या अत्यंत साहचर्याने असणारी अशी ही पुनर्जन्माची कल्पना आहे. जिचा एके वेळी पूर्ण नाश होतो, अशा वस्तूला केव्हांना केव्हां तरी आरंभ झाला असलाच पाहिजे; तसेंच एखाद्या वस्तूचा आरंभकाल निश्चित करतां येत असला तर केव्हांना केव्हां तरी तिचा अंत झालाच पाहिजे. जर जीवात्मा कधीं मरत नाही हें खरें मानले, तर तो केव्हां तरी जन्म पावतो त्याला आरंभ होतो-हें मानणे अत्यंत धाष्टांचे आहे. जीवात्मा हा पूर्ण स्वतंत्र आहे ही गोष्ट पुनर्जन्माच्या कल्पनेनेच सिद्ध होते. कोणत्या तरी एका काली जीवात्मा नवीन उत्पन्न