पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

२७

 हे सृष्टीस अनुरूप असेल तर आपणा सर्वांस पांच बोटें असणे हेहि अनुरूपच मटले पाहिजे.

 मनुष्यप्राणी कोणत्याहि काली आणि कोणत्याहि स्थली असो, त्याची आस्तिक्यबुद्धि जागृत झालीच पाहिजे. त्याचे चैतन्य जागृत झालेच पाहिजे. एका व्यक्तीच्या देहांत गडबड करतांना आढळतो तो कोण आणि साऱ्या विश्वांत प्रत्यक्ष दृश्यमान होणाऱ्या चैतन्याचे स्वरूप काय अशा प्रकारच्या प्रश्नांनी त्याच्या चित्तांत केव्हांना केव्हां तरी गोंधळ उडवून दिलाच पाहिजे. अशा प्रश्नपरंपरेस तो उत्तरे शोधू लागला ह्मणजे निरनिराळ्या तीन पायऱ्यांवरून त्यास या उत्तराकरितां चढावे लागते. नेहमी बदलत जाऊन शेवटीं नष्ट होणाऱ्या या शरीराशिवाय न बदलणारा असा आणखी एक निराळाच अंश प्रत्येक प्राण्यांत आहे ही गोष्ट सर्व धर्मानी कबूल केली आहे. हा अंश अविभाज्य, नित्य आणि केव्हांहि न बदलणारा असा आहे. ही एक पायरी झाली. हा अंश केव्हांहि मरत नाही ही गोष्ट खरी, परंतु तो पूर्वी केव्हां तरी एके काळी जन्मास आला असला पाहिजे असा सिद्धांत कित्येक धर्मानी प्रतिपादिला आहे. ही दुसरी पायरी झाली. परंतु जे जन्मास आले-नवीन उत्पन्न झाले त्याचा शेवट केव्हां ना केव्हां तरी होणारच हे उघड आहे. जन्म म्हटला की मृत्यु आणि आरंभ म्हटला की शेवट, या कल्पना आपोआपच मनांत उभ्या राहतात. हे कल्पनायुग्म अविभाज्य आहे. याकरितां आपणांतील जो चैतन्यांश आहे त्याला आरंभ असा कधी झालाच नाही, आणि ह्मणूनच तो कधी मरणार नाही ही गोष्ट खरी. तसेंचे दृश्यतेस आलेल्या या चैतन्याशिवाय आणखी एक न मरणारे असें महत् चैतन्य आहे, त्यास परमेश्वर अथवा परमात्मा अशी संज्ञा आहे. ही तिसरी पायरी झाली. मनुष्ययोनीचा आरंभ-सृष्टीचा आरंभ-असे शब्द जेव्हां आपण ऐकतों, तेव्हां 'आरंभ' या शब्दाने एका युगकालाच्या आरंभाचा बोध होतो असें समजावें. सृष्टीची व्यक्तदशा संपून कांहीं काल ती अव्यक्त स्थितीत राहते व नंतर पुन्हा ती व्यक्त होते. या दुसऱ्या व्यक्त होण्याच्या कालीं नव्या युगाला आरंभ होतो. 'आरंभ' या शब्दाने सर्व विश्वरचनेचा आरंभ असा अर्थ ध्वनित होतो असे समजू नये. 'ज्याला आरंभ आहे त्याला शेवट निश्चित आहे.' हा सिद्धांत आपण नीट ध्यानांत धरा. “ न त्वेवाहं जातुनासं न त्वं नेमे जनाधिपाः । न चैव न भविष्यामः सर्वे वयमतःपरम् ॥" या शब्दांनी भगवान् श्रीकृष्णांनी गीतेंत हाच सिद्धांत सांगितला आहे. तुमच्या देहाचा अंत केव्हांना केव्हां तरी होणारच; परंतु आत्म्याचा अंत मात्र कधीहि होणार नाही.